आता ऑलिम्पिकमध्ये गोल्ड जिंकायचेय…

जयेंद्र लोंढे ।  मुंबई

पुण्याची मराठमोळी नेमबाज पूजा घाटकर हिने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथील शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधत १० मीटर एअर रायफल या प्रकारात सुवर्ण पदकावर नाव कोरले. कॉमनवेल्थ शूटिंग चॅम्पियनशिपमधील देदीप्यमान कामगिरीद्वारे महाराष्ट्रासह हिंदुस्थानचा झेंडा सातासमुद्रापार दिमाखात फडकवणाऱ्या या कन्येला आता ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकायचे आहे. याच पार्श्वभूमीवर परदेशातून मायदेशात आल्यानंतर तिने दैनिक ‘सामना’शी साधलेला हा स्पेशल संवाद.

फळे आणि सॅण्डविच खाऊन गोल्ड जिंकले

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमधील कॉमनवेल्थ शूटिंग चॅम्पियनशिपसाठी पूजा घाटकरला चार दिवस तेथे राहावे लागले. या चार दिवसांत तिने फक्त आणि फक्त सॅण्डविच व फळे खाल्ली. हिंदुस्थानी सरकारकडून खेळाडूंना मिळणारा भत्ता नेहमीप्रमाणे तिला मिळाला. पण खेळाडूंच्या वास्तव्याची सोय जिथे करण्यात आली होती तिथे उत्तम रेस्टॉरण्ट नव्हते. तसेच हिंदुस्थानी जेवण व फिटनेसच्या दृष्टीनेही विचार करावा लागायचा. त्यामुळे पूजा घाटकरने सॅण्डविच व फळे खाऊन देशासाठी गोल्ड मेडल जिंकून आणले.

फक्त दोन दिवस सराव

पूजा घाटकर नवी दिल्लीत वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करीत होती. त्यानंतर थेट तिला ऑस्ट्रेलियामध्ये कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठी रवाना व्हावे लागले. ब्रिस्बेनमध्ये फक्त दोन दिवसांच्या सरावानंतर महाराष्ट्राच्या या खेळाडूला थेट स्पर्धेत सहभागी व्हावे लागले.

नेमबाजीत फिजिओथेरपी, जिमही महत्त्वाची

गेल्या काही काळात नेमबाजीत संस्मरणीय कामगिरी करणारी पूजा घाटकर या खेळामध्ये सर्वस्व पणाला लावत आहे. भविष्यातही तिला या खेळामध्ये अचूक नेम साधत पुढे जायचेय. यासाठी दिवसरात्र एक करून ती कसून सराव करतेय. सकाळच्या सत्रात नेमबाजीचा सराव केल्यानंतर संध्याकाळी ती जिम व फिजिओथेरेपीमध्ये हात आजमावत आहे. नीलेश काटकर यांच्याकडून फिजिओथेरेपीचे व अक्षय भापकर यांच्याकडून फिटनेसचे धडे ती घेत आहे. नेमबाजी हा खेळ इतर खेळांप्रमाणे शरीराची दमछाक करणारा नसला तरी एकाच ठिकाणी तीन ते चार तास उभे राहून आपली चुणूक या खेळामध्ये दाखवावी लागते. त्यामुळे या सर्व बाबी तेवढय़ाच महत्त्वाच्या ठरतात, असे ती आवर्जून सांगते. गगन नारंगचे मोलाचे मार्गदर्शन पूजा घाटकरला यावेळी लाभत आहे.

२०१८ गाजवायचेय…

पुण्याची पूजा घाटकर आता डिसेंबर महिन्यात जपान येथे होणाऱ्या आशियाई एअरगन चॅम्पियनशिपसाठी सज्ज होतेय. तसेच पुढल्या वर्षी (२०१८) आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये कॉमनवेल्थ, आशियाई, जागतिक चॅम्पियनशिप व वर्ल्ड कप या मानाच्या स्पर्धांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले आहे.