गोरगरीब रोजेदारांना सहेरीकरिता मिळणार अन्न आणि फळे

सामना प्रतिनिधी । मुंबई

सध्या मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान काळातील उपवास (रोझा) सुरू आहेत. त्यामुळे रोझा पाळणाऱ्या गोरगरीब रोजेदारांनाही सहेरीकरिता चांगले अन्न, फळे आणि इतर चीजवस्तू मिळाव्यात म्हणून शिव वाहतूक सेनेने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार इफ्तार पार्टीसाठी आणलेल्या अन्नापैकी शिल्लक राहणारे अन्न गोरगरीब रोजेदारांपर्यंत पोहचवले जाणार आहे.

मुंबईतील अनेक वस्त्यांमध्ये गोरगरीबांना रोझा सोडण्यासाठी स्वखर्चाने अन्न, फळे आणि इतर चीजवस्तू खरेदी करणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही, तर दुसरीकडे रात्री आणलेले अन्न आणि फळे न संपल्याने टाकून द्यावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यांची दखल घेत शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिव वाहतूक सेना शिल्लक अन्न, फळे आणि इतर चीजवस्तू गोरगरीबांपर्यंत पोहचवणार आहे. गोरगरीब रोजेदारांसाठी सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी मुंबईतील सर्व इफ्तार पार्टी आयोजकांनी शिव वाहतूक सेनेच्या मुख्यालयात (०२२-२५०३७७८१) संपर्क साधण्याचे आवाहन हाजी अरफात शेख यांनी केले आहे.