हॉटेलमधल्या शॅम्पूच्या बाटलीमुळे बनू शकतो तुमचा अश्लील व्हिडीओ

सामना ऑनलाईन । वेलिंग्टन

आपण जेव्हा बाहेरगावी जातो तेव्हा राहण्यासाठी चांगलं आणि परवडणारं हॉटेल निवडतो. ते निवडताना आपण साधारणतः त्यात आरामदायी सुविधा बघतो. पण, आता त्यासोबत हॉटेलचे बाथरूमही नीट तपासून घ्यायला विसरू नका. कारण हॉटेलकडून पुरवण्यात येणाऱ्या शॅम्पूच्या बाटलीमुळे तुमचे खासगी क्षण रेकॉर्ड होऊ शकतात.

अशक्य वाटणारी ही गोष्ट घडलीये न्यूझीलँड येथील एका हॉटेलमालकावर बाथरुममध्ये शॅम्पूच्या बाटलीमध्ये छुपा कॅमेरा ठेवून महिलांचे व्हिडीओ बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ३४ महिलांचे २१९ व्हिडीओ क्लिपिंग जप्त केले आहेत. हा मालक पॉर्नसाईटवर हे व्हिडीओ अपलोड करत असे. जेव्हा एखादी महिला त्याच्या हॉटेलमध्ये राहायला येत असे, तेव्हा तो तिला अशी खोली देत असे, जिथे शॅम्पूच्या बाटलीत छुपा कॅमेरा बसवला असेल. त्यानंतर तो व्हिडीओ मिळवून पॉर्नसाईटवर अपलोड करत असे.

या प्रकरणानंतर पुन्हा एकदा हॉटेलमध्ये बसवण्यात येणाऱ्या या छुप्या कॅमेऱ्याचा विषय चर्चिला जाऊ लागला आहे. अशा प्रकारचे विकृत हॉटेलमधील पडद्याचे हुक, लॅम्प्स, दरवाजाची फट इत्यादींमध्येही छुपा कॅमेरा लपवून व्हिडीओ बनवत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हॉटेलच्या खोलीतील हे भागही नीट तपासून पाहावेत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.