इतिहासाला मिळणार उजाळा, ठाण्यात जमिनीत गाडलेल्या सहा तोफांनी घेतला मोकळा श्वास

67
old-tank

सामना प्रतिनिधी । ठाणे

कोपरी येथील खाडीकिनारी मीठबंदर भागात सुमारे 300 वर्षे जमिनीत गाडलेल्या सहा तोफांनी आज मोकळा श्वास घेतला. विविध संस्थांच्या 30 इतिहासप्रेमी तरुणांनी दोन दिवस श्रमदान करून या तोफा जमिनीतून बाहेर काढल्या. या सर्व तोफा पोर्तुगीजकालीन असून त्यानिमित्त इतिहासाला उजाळा मिळणार आहे. जमिनीत गाडलेल्या एकूण 11 तोफा असून त्या सर्व बाहेर काढल्या जाणार आहेत. या तोफा सर्वसामान्य ठाणेकरांना दिसाव्यात तसेच त्याचे संवर्धन व्हावे यासाठी चबुतरा बांधण्यात आला आहे.

ठाणे हे ऐतिहासिक शहर असून सोळाव्या शतकात पोर्तुगीज व अरबी लोकांनी येथील बंदराचा व्यापारासाठी उपयोग केला असल्याची नोंद आहे. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा शहरात आढळून येतात. सध्याचे मध्यवर्ती कारागृह म्हणजे पूर्वीचा भुईकोट किल्ला असून त्यांच्या संरक्षणासाठी सुमारे 40 तोफा तैनात करण्यात आल्या होत्या. त्यापैकीच कोपरी भागात काही तोफा असाव्यात असा अंदाज आहे. काळाच्या ओघात या तोफा मातीमध्ये गाडल्या गेल्या.

  • मातीमध्ये गाडल्या गेलेल्या ऐतिहासिक तोफांना नवसंजीवनी मिळावी यासाठी महाराष्ट्र पुरातत्व विभाग, गडसंवर्धन समिती, चेंदणी कोळीवाडा ट्रस्ट, दुर्गवीर प्रतिष्ठाण दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट व कोकण इतिहास परिषद या संस्थेने पुढाकार घेतला.
  • शनिवारपासून सुमारे 40 कार्यकर्त्यांनी ‘जोर लगा के हैया’ असे म्हणत जमिनीच्या खाली सुमारे पाच फूट खोल असलेल्या वजनदार तोफा बाहेर काढण्यास सुरुवात केली. आज संध्याकाळपर्यंत एकूण 6 तोफा काढण्यात यश आले आहे. तोफ उचलण्यासाठी क्रेनचीदेखील मदत घेण्यात आली.
आपली प्रतिक्रिया द्या