मालिकेचं चित्रीकरण करताना अभिनेत्रीने केला आगीशी सामना

सामना ऑनलाईन । मुंबई

कोणतीही मालिका यशस्वी करण्यासाठी त्यामागे खूप परिश्रम असतात. कलाकारांपासून ते स्पॉटबॉयपर्यंत अनेक जण चित्रीकरणात मेहनत करत असतो. पण, याच परफेक्ट होण्याच्या गडबडीत कधीकधी अपघात होतात. असंच काहीसं झालंय ते पोरस या मालिकेच्या सेटवर. पोरसमध्ये एका महत्त्वाच्या दृश्याचे चित्रीकरण करत असताना ऑलिम्पियाची भूमिका करणाऱ्या समीक्षा सिंहला आगीचा सामना करावा लागला.

मालिकेत घडणाऱ्या घटनांच्या नाट्यात्मक वळणावर ऑलिम्पिया अर्टेमिस मंदिर जाळते असे दृश्य होते. हे दृश्य चित्रीत करताना आगीची झळ समीक्षाला बसली आणि तिचा चेहरा आणि पाठ किंचीत होरपळली. समीक्षा सिंहशी संपर्क साधला असता, तिने या घटनेला दुजोरा देत म्हटलं की, “होय, मला पाठीवर आणि चेहर्यारवर किंचित भाजले. पण खरे सांगायचे तर काय झाले हे कळायला मला काही क्षण लागले. मी सर्व आवरून फ्रेश होण्यास गेले तेव्हा ते माझ्या ध्यानात आले. मला पाठीवर खूप जळजळत होते आणि मेक-अप उतरवताना त्वचेस खूप इरिटेशन होत होते. जेव्हा मी आरशात पाठ पहिली, तेव्हा पाठीवर लाल रंगाचे चट्टे होते आणि माझा चेहरा उन्हात प्रचंड रापल्यासारखा दिसत होता.”

समीक्षाने सेटवर केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दल देखील सांगितले. “मला तत्काळ मदत मिळाली आणि ते डाग आता हळूहळू नाहीसे होत आहेत. आग लावण्यापूर्वी सर्व अग्निशामक उपकरणे तपासण्यात आली होती, मीडिया मदत तयार ठेवण्यात आली होती आणि कोणालाही इजा होणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती.” असंही समीक्षाने म्हटलं आहे.