भाजपविरोधात रशियातून पोस्ट, मुख्यमंत्र्यांचा आरोप

सामना ऑनलाईन, नागपूर

काँगेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील प्रचारात भाजपवर मात केल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपविरोधात रशियासारख्या देशातून ‘पोस्ट’ टाकल्या जात आहेत असा आरोप करून आज खळबळ उडवून दिली. बनावट अकाऊंटस् तयार करून भाजपविरोधात ट्विटस्, रिट्विटस् केले जात असल्याचे आढळून आले आहे, असा दावा त्यांनी केला.

मागील दोन महिन्यांपासून भाजपच्या बाबतीत नकारात्मक प्रचार सोशल साइटस्वरून सुरू झाला आहे असे सांगून ते म्हणाले की, सुरुवातीला आम्ही त्याचा प्रतिवाद केला नाही. पण तशा अपप्रचाराला आता आम्हीसुद्धा उत्तर देणार आहोत.

समाजात दुफळी माजवणारी पोस्ट टाकल्याबद्दल राष्ट्रवादी काँगेसच्या एका कार्यकर्त्याला अलीकडेच पकडण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन जानेवारीत
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन येत्या जानेवारीत करण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्या महामार्गाच्या जमीन खरेदीची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. त्या महामार्गासाठी कोरियाकडून अर्थसहाय्य होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.