राज्यातील पहिली पोस्ट बँक संभाजीनगरात

संभाजीनगर
महाराष्ट्रातील पहिली पोस्ट बँक एप्रिल २०१७ पासून संभाजीनगरात सुरू करण्यात येणार असून या बँकेसाठी जुना बाजार पोस्ट ऑफिसमधील ११०० चौरस फूट जागा निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने देशभरात ६५० पोस्ट बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

संभाजीनगरातील जुना बाजार भागातील मुख्य टपाल कार्यालयात या बँकेची सुरुवात करण्यात येणार आहे. याच परिसरात पोस्ट एटीएमही सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांच्या विभागीय कार्यालयांतर्गत ही पहिली इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) असेल. या बँकेतून कर्ज वितरण, क्रेडिट कार्ड वितरण वगळता अन्य बँकिंग व्यवहार होणार आहेत.

देशभरातील पोस्टाच्या ६५० शाखांमध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) सुरू करणार आहे. त्यासाठी ४०० कोटी रुपये भागभांडवलाच्या रुपाने व ४०० कोटी रुपये शासनाच्या मदतीने उभारण्यात येणार आहेत. बॅंकींग क्षेत्रातील ५० कंपन्यांनी या बँकेत भागीदारी करायची तयारी दर्शवली आहे. तर १५ कंपन्यांनी या बँकेचा कारभार हाताळण्याची तयारी दाखविली आहे.