हेच ते अच्छे दिन; पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीवरुन शिवसेनेने लावले पोस्टर

1

सामना प्रतिनिधी । तुमसर (भंडारा)

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. पेट्रोलचे दर नव्वदीकडे वाटचाल करू लागले आहेत. ‘बहुत हुई महंगाई की मार, अच्छे दिन आनेवाले है’, अशा घोषणा देऊन सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर चढेच राहिल्यानं सर्वसामान्य त्रस्त आहेत. हेच ते अच्छे दिन, असा मजकूर असलेले पोस्टर शिवसेना- युवासेना तर्फे तुमसर शहरातील पेट्रोल पंपावर लावण्यात आले आहेत.

शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये 2015 आणि 2018 मधील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांचे आकडे देण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर गेल्या तीन वर्षांमध्ये किती वाढले, हे दाखवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. हेच ते अच्छे दिन, असा उपरोधिक टोलादेखील शिवसेनेनं लगावला आहे. तसेच घसरता रुपया, नोटबंदी, जीएसटी, आणि पेट्रोल- डिझेल गॅसच्या वाढत्या किमतींवरुन शिवसेनेने निदर्शने केले. भाजपा हा खोटारडा पक्ष असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली.

बुधवारी देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. पेट्रोलचे दर प्रति लिटर 14 पैशांनी, तर डिझेलचे दर 15 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी शहरात 88.84 रुपये तर डिझेलसाठी 76.07 रुपये मोजावे लागत आहेत. मागील महिन्याभरात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 4 रुपयांनी, तर डिझलेच्या दरात 5 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

यावेळी शहरातील भारत पेट्रोलियम पंपावर पोस्टर लावून शिवसेना- युवासेना तर्फे निदर्शने करतांना युवासेना जिल्हा समन्वयक मनोज चौबे, शिवसेना जिल्हा कार्यालयीन प्रमुख अमित एच. मेश्राम, युवासेना तालुका अधिकारी संजू डहाके, शिव वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे, उपशहर प्रमुख जगदीश त्रिभुवनकर, जनकल्याण नागरी सह. पत संस्थेचे संस्थापक राजूभाऊ निखाडे, विभाग प्रमुख मोहनिष साठवणे, आशिष राखडे, महेश बानासुरे, सागर मिश्रा, प्रवीण गुप्ता, अनिल माहुले, कैलास राखडे, खुशाल काळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.