पोलीस आयुक्त राजकारण्यांच्या पुढे; मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

उत्तर प्रदेशात आपल्या वादग्रस्त कामांनी चर्चेत राहिल्यानंतर संभाजीनगरचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव आता राजकारण्यांच्याही पुढे निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी संभाजीनगरमध्ये येणार होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी चक्क आयुक्तांनीच शहरभर पोस्टरबाजी केली. यशस्वी यादवांचा लोचटपणा शहरात चर्चेचा विषय ठरला.

चौकाचौकात पोस्टरबाजी करणे हे राजकारण्याचे नेहमीचेच काम पण एखाद्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यानेच पोस्टरबाजी केली तर! संभाजीनगरचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी हा प्रताप केला आहे. शिष्टाचाराचा भाग नसताना आयुक्तांनी शहरभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे छायाचित्र असलेले पोस्टर लावले आहेत. संभाजीनगरमधील क्रांती चौकात असलेल्या स्मृतिस्तंभाचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस येणार होते. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी पोलिसांनी केलेल्या कामाची यादी छापून पोस्टरबाजी केली. मुख्यमंत्र्याजवळ जाण्यासाठी यादव यांनी केलेली ही पोस्टरबाजी शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे.

हा खटाटोप कशासाठी?
पोलीस प्रशासनाने शहरात राबवलेल्या उपक्रमांची जाहिरात करण्यात काहीही चुकीचे नाही, पण अशा पोस्टरवर मुख्यमंत्र्यांसोबत स्वताचा फोटो छापणे चुकीचेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाण्यासाठी हा खटाटोप यशस्वी यादवांनी केल्याची चर्चा पोलीस अधिकाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात करण्यात येत आहे.

यादवांवर कारवाई होणार का?
सनदी अधिकाऱ्याला स्वागताची पोस्टरबाजी करता येते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मे २०१७ मध्ये संभाजीनगरचे तत्कालीन पोलीस महासंचालक परळी दौऱ्यावर आले होते. यावेळी माजलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत मानकर यांनी महासंचालकांच्या स्वागताचे पोस्टर शहरात लावले होते. या प्रकरणी हेमंत मानकर यांची तडकाफडकी माजलगावहून बीड मुख्यालयात बदली करण्यात आली होती. त्यामुळे पोस्टरबाजी करणाऱ्या पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.