चंद्राबाबूंच्या आंदोलनावर पाणी फिरवू शकतं असं ‘हे’ वाक्य तिथे कुणी लिहिलं?

22
tdp-protest-delhi


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंध्र प्रदेशच्या जनतेची मोदी सरकारकडून फसवणूक करण्यात आली आहे, असा आरोप करत राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज दिल्लीत आंध्र प्रदेश भवन येथे उपोषणाला बसले आहेत. चंद्राबाबू नायडू यांना विरोधी पक्षासह जनतेची साथ मिळाल्याचे चित्र असले तरी उपोषणस्थळापासून जवळच लिहिले गेलेले एक वाक्य चंद्राबाबूंच्या आंदोलनावर पाणी फिरवू शकते. मात्र ते वाक्य आंदोलकांनी लिहिले आहे की आणखी कुणी आंदोलनाला वेगळा रंग देण्यासाठी लिहिलं आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियावरच त्याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.

‘ज्याच्या हाती चहाचा रिकामा कप द्यायचा, त्याला जनतेने सत्ता दिली’ असं वाक्य चंद्राबाबू यांच्या उपोषणस्थळा जवळ असलेल्या नंदीच्या मूर्तीजवळ सफेद रंगाच्या कागदावर हिंदीत लिहून ठेवण्यात आलं आहे. तेलगू देसम पक्षाकडून सुरू असलेल्या आंदोलनात काळ्या फलकावर पांढरी अक्षंर आणि पिवळ्या रंगाचा वापर सगळीकडे दिसतो आहे. तसेच इंग्रजी आणि तेलगू भाषेतच आंदोलकांचे फलक आहेत. त्यामुळे ‘चहाचा रिकामा कप…’चं वाक्य असलेला फलक हा आमच्या पक्षातील कुणी ठेवलेला नाही असं पक्षाच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुळात हिंदी विरोधी पट्ट्यातील हे राज्य असल्याने हिंदीत फलक लिहिणे शक्य नाही. रंगसंगती देखील वेगळी दिसते. कारण अन्य सर्व फलक हे काळ्यारंगावर पांढऱ्या अक्षरात लिहिले गेलेले आहेत. तर हा फलक पांढऱ्या पेपरवर काळ्या अक्षरात लिहिला गेला आहे. असे अनेक दावे सोशल मीडियावरून केले जात आहेत.

पंतप्रधानांबद्दल असं लिहिणं हे योग्य नाही. हे आम्ही लिहिलेलं नाही. असं कृत्य कुणीही करू नये, असं स्पष्ट मत टीडीपीचे खासदार जयदेव गाला यांनी व्यक्त केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या