‘टीम इंडिया’च्या कामगिरीचे होणार पोस्टमॉर्टम

virat-kohli-ravi-shastri-test

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कसोटी क्रमवारीत ‘नंबर वन’ असलेल्या विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ला बहुचर्चित इंग्लंड दौऱ्यावर आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. एकदिवसीय मालिकेत पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर हिंदुस्थानने पाच सामन्यांची कसोटी मालिकाही अखेरच्या लढतीपूर्वीच 1-3 अशी गमावली आहे. या मालिकेतील निराशाजनक कामगिरीचे पोस्टमॉर्टम होणार असून संघातील खेळाडूंना आणि संघ व्यवस्थापनाला कारवाईचा सामना करावा लागू शकतो असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने ‘बीसीसीआय’वर नेमलेल्या प्रशासकीय समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी दिले आहेत.

‘बीसीसीआय’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले, ‘सीओए’ची मुंबईमध्ये 11 सप्टेंबरला एक बैठक होणार आहे. या बैठकीत ‘बीसीसीआय’ला नवीन घटना लागू करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्याचवेळी ‘बीसीसीआय’ची प्रशासकीय समिती संघ व्यवस्थापनाकडून इंग्लंड दौऱ्यावरील  कामगिरीचा आढावा मागवला जाईल. ‘सीओए’ प्रमुख विनोद राय म्हणाले, याबाबत मी सध्या कोणतेही आश्वासन देत नाही, परंतु संघाच्या कामगिरीचे परीक्षण केले जाईल. संघ व्यवस्थापनाच्या अहवालानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ असे राय यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासन समिती ‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा क्लास घेणार एवढे नक्की.

रवी शास्त्रीवरील नाराजी वाढली

इंग्लंड दौऱ्यावर हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली, मात्र फलंदाजांच्या अपयशामुळे त्यांची कामगिरी झाकोळली गेली. यात संघ व्यवस्थापनाची भूमिकाही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यात प्रामुख्याने प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्याकरील नाराजी अधिक काढली आहे. अंतिम अकरा खेळाडू निवडण्याच्या त्यांच्या भूमिकेकर टीका होत आहे. त्यामुळे प्रशासकीय समितीने दिलेल्या इशाऱ्यांचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. आता रवी शास्त्री ‘टीम इंडिया’तील कामगिरीच्या पोस्टमॉर्टमला कसे सामोरे जातात याकडे तमाम क्रिकेटशौकिनांचे लक्ष असेल.