गणितात चांगले गुण हवेत, मग बसण्याची पद्धत बदला!

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

शीर्षक वाचून गोंधळून गेला असाल ना? गणितात चांगले गुण मिळवण्याचा आणि बसण्याच्या पद्धतीचा काय संबंध? असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण झाला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. गणितात चांगले गुण मिळवण्यासाठी बसण्याच्या पद्धतीचा संबंध असल्याचं एका अहवालाने सिद्ध केलं आहे.

सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठाने केलेल्या एका चाचणी अहवालातून ही बाब समोर आली आहे. विद्यापीठातर्फे १२५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला आणि परीक्षेला बसण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यात आला. त्यांना ८४३ मधून ७ वजा करण्याचं साधं गणित देण्यात आलं. हे गणित सोडवण्यासाठी जास्तीत जास्त १५ सेकंदांचं प्रमाण निश्चित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा गणित सोडवण्याचा वेग तपासण्यात आला. हे विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने बसले होते. विशेष म्हणजे, या चाचणीनंतर ५६ टक्के विद्यार्थ्यांनी हे गणित कमीत कमी वेळात सोडवल्याचं निष्पन्न झालं. हे विद्यार्थी अतिशय आरामदायी पद्धतीने बसले होते. शरीर सैल सोडलेल्या स्थितीत बसल्याने त्यांच्या मेंदुला झटपट निर्णय घेण्यास मदत झाली, असं या अहवालाअंती निष्पन्न झालं आहे.

दुसरीकडे डेस्कवर झोपलेल्या अवस्थेत हे गणित सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त वेळ लागल्याचंही समोर आलं. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे शरीर डेस्कवर ठेवल्यामुळे मेंदू सुस्तावतो आणि गुंतागुंतीचे किंवा क्लिष्ट विषय सोडवण्यासाठी अधिक वेळ घेतो. तसंच अशा प्रकारच्या बसण्याच्या पद्धतीत तुम्हाला जुन्या आठवणी येतात आणि तुमची एकाग्रता भंग पावते, असंही निदान झालं आहे. या चाचणीपूर्वी संबंधित विद्यार्थ्यांना गणित सोडवताना जाणवणारा ताण किंवा उत्साह यांचीही चाचणी घेण्यात आली होती.