ठाण्यात खड्डे भरणी जोरात.. महापौरांसह नगरसेवक, पदाधिकारी रस्त्यावर

सामना प्रतिनिधी । ठाणे

पाऊस थांबताच ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे काम महानगरपालिकेने युद्धपातळीवर सुरू केले आहे. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी रस्त्यावर उतरले असून ते या कामावर वॉच ठेवून आहेत.

महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृहनेते व ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, नगरसेवक सुधीर कोकाटे आदींनी मीनाताई ठाकरे चौक, एसटी वर्कशॉप, वर्तकनगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर, मानपाडा सिग्नल, तीन हातनाका, पातलीपाडा येथे कामाची पाहणी केली.

वर्षा मॅरेथॉनपूर्वी रस्ते चकाचक होणार
2 सप्टेंबर रोजी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन असून त्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे त्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असून ठाणेकरांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक स्वतः उभे राहून कामाचा आढावा घेत असल्याचे सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी सांगितले.