डांबरीकरण केलेला रस्ता २४ तासात खचला

8

सामना प्रतिनीधी । मालवण

शहरातील मुख्य रस्त्यावर डांबरीकरण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी तीन मोठे खड्डे पडल्याचा प्रकार सकाळी घडला. एका खड्डयात रिक्षाचे चाक अडकले.
या घटनेची माहिती मिळताच
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, भाऊ सामंत, यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी प्रदीप पाटील यांना धारेवर धरले.

दरम्यान मुख्य रस्त्यावर काल रात्री डांबर घातल्यावर दुसऱ्याच दिवशी मोठे खड्डे पडल्याने हे काम बोगस झाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही हे काम बोगस झाल्याची कबुली दिली. अखेर हे काम दर्जेदार पद्धतीचे करून घेऊ असे आश्‍वासन बांधकामच्या अधिकाऱ्यांनी पदाधिकार्‍यांना दिले.

कसाल-मालवण या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. यात शहरातील मुख्य रस्त्याचे काम मध्यरात्री केले जात असून या कामावर देखरेख ठेवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही ठेकेदार, सुपरवायझर नसल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी भाऊ सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे भरड येथील काम स्थानिक नागरिकांनी रोखले. यात काल मध्यरात्री याच मुख्य रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करण्यात आले. यानंतर आजच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी बसस्थानक समोरील रस्त्यावर तीन खड्डे पडले. यात एका रिक्षाचे चाक अडकले. सुर्देवाने मोठा अपघात टळला. याची माहिती मिळताच पालिकेचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी भाऊ सामंत, नगरसेवक मंदार केणी, महेश जावकर, लीलाधर पराडकर, महेश गिरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सार्वजनिक बांधकामचे अधिकारी प्रदीप पाटील यांना घटनास्थळी बोलावून घेत चांगलेच धारेवर धरण्यात आले. बसस्थानक समोरील रस्त्यावर माती असलेल्या भागावरच डांबर टाकण्यात आले. प्रत्यक्षात या रस्त्याच्या खाली मोरीचे बांधकाम करणे आवश्यक असून बोल्डर टाकून त्यानंतर डांबर टाकायला हवे होते. मात्र याची कोणतीही कार्यवाही न झाल्यानेच रस्त्यावर खड्डे पडले. डांबरीकरणाचे काम मध्यरात्री केले जात असून बांधकामाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्यानेच हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे असा आरोप करत श्री. वराडकर, श्री. सामंत यांनी बांधकामच्या अधिकार्‍यांना जाब विचारला. या रस्त्यावर भुयारी गटार योजनेचे तसेच पाण्याची पाईपलाईन असल्याने हे काम करण्यापूर्वी त्याची कल्पना पालिकेला दिली होती का? अशी विचारणा श्री. वराडकर यांनी केली. मात्र बांधकाम विभागाने याची माहिती लेखी स्वरूपात न दिल्याची माहिती मिळाली. डांबरीकरणाचे काम योग्य दर्जाचे आहे का? अशी विचारणा उपनगराध्यक्ष वराडकर यांनी केली असता हे काम बोगस झाल्याची कबुली बांधकामच्या अधिकार्‍यांनी दिली. डांबरीकरणाचे काम करताना देऊळवाडा भागात पाणी पुरवठ्याची उपवाहिनी तुटल्याने या भागातील नागरिकांचे पाण्याअभावी हाल झाल्याने याप्रश्‍नीही नागरिकांनी बांधकामच्या अधिकार्‍यांना चांगलेच सुनावले. दरम्यान नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी करत निकृष्ट रस्त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.

पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असून या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी डांबरीकरणाचे काम का केले नाही अशी विचारणा श्री. वराडकर यांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना केली. रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने व्हायला हवे असे सांगितले. अखेर या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करून घेतले जाईल असे बांधकामचे अधिकारी श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या