मसुरेला जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था

82

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण तालुक्याचे मध्य केंद्र असलेल्या मसुरे गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या कांदळगाव-मसुरे या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास म्हणजे अपघातास निमंत्रण अशी स्थिती आहे. गणेश चतुर्थी उत्सवापूर्वी मसुरे मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करत रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तोडावी. अन्यथा पूर्वकल्पना न देता आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी दिला आहे.

दरम्यान काही रस्त्यांवरील खड्डे जांभ्या दगडाने बुजवण्यात येत आहेत. मात्र मुसळधार पावसात दगड माती वाहून गेल्यास त्याला जबाबदार कोण असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

मसुरे जोडणाऱ्या रस्त्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सावंतवाडी व जिल्हापरिषद बांधकाम विभाग सिंधुदुर्ग यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी चतुर्थी उत्सवापूर्वी खड्डे बुजवणे व झाडी कटाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती प्रभुगावकर यांनी दिली. मात्र बांधकाम विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग पाहता सर्व मार्गावरील खड्डे बुजवून झाडी तोडण्याचे काम वेळेत होईल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तरी बांधकाम विभागाने तालुक्यात सर्वच रस्त्यांचे खड्डे बुजवणे व झाडी तोडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारून कार्यवाही करावी. अशी मागणीही करण्यात आल्याचे प्रभुगावकर यांनी सांगितले. तर या पूर्वी या रस्त्यांवर अपघातही घडले असून त्याचीही गंभीर दखल घेण्यात यावी याबाबतही प्रभुगावकर यांनी लक्ष वेधले.

मसुरेला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांपैकी ओझर-कांदळगाव-मसुरे-बांदिवडे व काळसे-कट्टा-मसदे-मसुरे हे दोन्ही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. तर चौके-आमडोस-माळगाव-मसुरे या रस्त्या दरम्यान भोगलेवाडी ते देऊळवाडा दरम्यान रस्ता खड्डेमय बनला आहे. या सर्व रस्त्यांवरील खड्डे बजावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

तात्पुरती मलमपट्टी नको
कांदळगाव मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्यासाठी काही ठिकाणी रस्त्यांवर जांभा दगड, माती टाकण्यात आली. मात्र मुसळधार पावसात माती वाहून जात पुन्हा खड्डे पडण्याची भीती आहे. तरी खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी नको. जर रस्ता दुरुस्तीचे टेंडर निघाले असेल तर त्यांचीच यंत्रणा उभारून अथवा पावसाळी डांबर वापरून बांधकाम विभागाने काम करून घ्यावे. अशी सूचनाही प्रभुगावकर यांनी केली आहे.

पंचायत समिती सदस्य रस्त्यावर
कोळंब पंचायत समिती सदस्या सोनाली कोदे यांनी खड्डेमय रस्ते, वाढलेली झाडी याबाबत पंचायत समिती सभेत वारंवार प्रश्न उपस्थित केले. बांधकाम विभागाचेही लक्ष वेधले होते. त्यानुसार मंगळवार-बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कांदळगाव मार्गावरील खड्डे जांभ्या दगडाने बुजवण्याची कार्यवाही सोनाली कोदे यांच्या उपस्थितीत सुरू होती. मात्र मुसळधार पावसाचा विचार करता बुजवलेले खड्डे किती दिवस राहणार असा सवाल उपस्थित होत होता.

आपली प्रतिक्रिया द्या