दिवाळीत गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरू अशी प्रशासनाने गणेशोत्सवात केलेली घोषणा कागदावर आणि दिवाळी आली तरी खड्डे रस्त्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची अनेक ठिकाणी चाळण झाली असून दिवाळीत गावी येणाऱया चाकरमान्यांचे प्रवासात कंबरडे मोडणार आहे.

पावसाळय़ात मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली. गणेशोत्सवात मोठय़ा संख्येने चाकरमानी गावी येतात म्हणून प्रशासनाने खड्डे भरणार असल्याचे जाहीर केले होते. गणेशोत्सवातच खड्डे जैसे थे राहिल्याने गावी येणाऱया चाकरमान्याचे कंबरडे मोडले.

वांद्री ते संगमेश्वर या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. सध्या पाऊस सुरू असल्यामुळे भल्यामोठय़ा खड्डय़ांचा अंदाज न आल्याने वाहनचालकांबरोबरच प्रवाशांना हा प्रवास संघर्षमय होत आहे. संगमेश्वर ते चिपळूण आणि चिपळूणपासून खेडपर्यंत खड्डेमय महामार्ग झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा होत आहे. गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक बांधकामने महामार्गावरील खड्डे भरू असे जाहीर केले होते पण गणेशोत्सवात खड्डय़ांतून प्रवास करतच चाकरमानी गावी पोहचला. गणेशोत्सवानंतर प्रशासनाला आपल्या घोषणेचा विसर पडला आणि त्यानंतर झालेल्या पावसात हे खड्डे आणखीनच मोठे झाले आहेत.

घोषणा कागदावर आणि खड्डे रस्त्यावर

आता दिवाळीत गावी येणाऱया चाकरमानी आणि पर्यटकांना खड्डय़ांतूनच संघर्षमय प्रवास करावा लागणार आहे. बाहेरगावाहून येणाऱया चालकांना रस्त्याचा अंदाज नसल्याने खड्डेमय रस्त्यातून प्रवास करणे अतिशय अवघड होत आहे. महामार्गावरील हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत.