दिंडोरीत शेतीपंपांचा विद्युत पुरवठा पुन्हा सुरू

सामना ऑनलाईन । नाशिक

थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी ठिकठिकाणचे ट्रान्सफॉर्मर बंद करून शेतीपंपांचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने काल दिंडोरीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. शिवसेनेच्या दणक्यानंतर त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

दिंडोरी तालुक्यात यावर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले, टोमॅटो, द्राक्षे, भाजीपाला व इतर फळभाज्याही उद्ध्वस्त झाल्या, यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. दिवाळीचा सणसुद्धा अत्यंत अडचणीत साजरा केला गेला. अशातच शेतीपंपाचे वीजबिल न भरल्याने वीज वितरणने ठिकठिकाणचे ट्रान्सफॉर्मर बंद करून शेतीपिकांचा विद्युत पुरवठा खंडीत केला, यामुळे सध्या हाताशी आलेली पिकेही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱयांची चिंता आणखी वाढली होती.

ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शिवसेनेने दिंडोरीत वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर धडक दिली. वीज वितरणच्या कारभाराचा निषेध करीत विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्याची जोरदार मागणी केली, उपअभियंता एन. एम. सोनवणे यांना घेराव घातला. या दणक्यानंतर त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश त्यांनी दिले. या आंदोलनात माजी आमदार धनराज महाले, प्रवीण जाधव, सतिश देशमुख, सुरेश डोखळे, सुनील पाटील, विश्वासराव देशमुख, ऍड. विलास निरगुडे, सुरेश देशमुख, राजाभाऊ गोतरणे, पांडुरंग गणोरे, सदाशिव गावीत आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.