प्रभा अत्रे अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

या वेळी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवास पोलीस दलातर्फे शोक प्रसंगीचे बिगुल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज स्व. प्रभा अत्रे यांची भाची मनीषा रवी प्रकाश यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी सहपोलीस आयुक्त (प्रभारी) रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त संदीप गिल, स्वरमयी गुरुकुलचे प्रसाद भडसावळे व संजीव महाजन यांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.