गोरेगाव येथे साकारणार प्रभाकर पणशीकर नाट्यगृह

मुंबई– गोरेगाव येथे महापालिका मंडई व वातानुकूलित नाट्यगृह असा संयुक्त प्रकल्प उभारत आहे. या नाट्यगृहाला नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आज सभागृहात मंजूर करण्यात आला.
गोरेगाव येथील मंडई तसेच नाट्यगृहाच्या निर्मितीसाठी शिवसेना नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई गेली २० वर्षे प्रयत्नशील होते. या नाट्यगृहाला प्रभाकर पणशीकर यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव नगरसेवक राजू पाध्ये यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडे सादर केला हाता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व प्रभाकर पणशीकर यांचे निकटचे संबंध होते. शिवसेनाप्रमुखांना जबरदस्त ताकदीचे अभिनेते म्हणून पणशीकर यांच्याबद्दल नितांत आदर होता. पणशीकर यांच्याविषयी नाट्यप्रेमींमध्ये असलेल्या आदरभावानुसार या नाट्यगृहाला त्यांचेच नाव देण्यात यावे, अशा राजू पाध्ये यांच्या ठरावाला आज मंजुरी देण्यात आली.

७५० आसनक्षमतेचे नाट्यगृह
आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी तयार केलेल्या प्रकल्पाच्या आराखड्याला महापालिकेने मंजुरी दिली असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आचारसंहितेचा काळ सुरू होण्याची शक्यता गृहीत धरून प्रकल्पाचे भूमिपूजन त्यानंतरच होईल. संयुक्त प्रकल्पात २०६ जुन्या गाळेधारकांसाठी मंडई, ७५० आसनक्षमतेचे वातानुकूलित नाट्यगृह व वरील मजल्यावर निवासस्थाने असणार आहेत. गाळेधारकांसाठी बांधकाम कालावधीकरिता पर्यायी गाळेही महापालिकेने बांधले आहेत. या प्रस्तावित नाट्यगृहामुळे मुंबईत आणखी एका नाट्यगृहाची भर पडणार असून गोरेगावकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.