पोलीस डायरी – नामर्दांच्या टोळय़ा

फोटो प्रातिनिधीक

प्रभाकर पवार ([email protected])

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी, अश्विन नाईक आदी बडय़ा गुंड टोळय़ांचे धमक्या देऊन लाखो रुपये खंडणी उकळण्याचे सत्र थंडावल्यानंतर पुजारी टोळीचे धमक्या देऊन खंडणी उकळण्याचे सत्र वाढले आहे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या रवी पुजारीला व्यावसायिकांना धमक्या देऊन खंडणी उकळण्यात यश आल्यानंतर आता कुणी सुरेश पुजारी नामक ‘फोन भाई’ उदयाला आला आहे. अलीकडेच या गुंडाच्या इशाऱ्यावरून भिवंडी-नाशिक हायवेवरील के. एन. पार्क या हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या स्वरा रामचंद्र शिरसाट या पंचवीस वर्षीय तरुणीवर हॉटेल मालकाने खंडणी देण्यास नकार दिला म्हणून गोळीबार केला. त्यात स्वरा ही गंभीर जखमी झाली. एका पायात गोळी घुसल्याने ती आता अपंग झाली आहे. तेव्हा प्रश्न पडतो खंडणीसाठी मालकाला धमकावणारे हे गुंड आहेत की निरपराधांवर (ज्यांचा मालकाच्या व्यवहाराशी संबंध नाही) हल्ला करणारे षंढ आहेत. तुम्ही स्वतःला भाई समजता. भाईचा आव आणून परदेशातून इंटरनेट कॉल करता. मग तुम्ही स्वतः का नाही मैदानात उतरून मालकाशी दोन हात करीत? गरीब व सामान्यांना का टार्गेट करता, असा सवाल सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे.

मालक खंडणी देत नाही किंवा जुमानत नाही म्हणून त्यांच्या नोकरांवर हल्ले करायचे हा या गुंडांचा कोणता धर्म? पोलिसांच्या चकमकी थांबल्या, एन्काऊंटर बंद झाले. पोलीस जेलमध्ये जाऊ लागले म्हणूनच पुजारीसारख्या टोळय़ांची हिंमत वाढली आहे. दीड दशकापूर्वी मुंबईतील कुर्ला-नेहरूनगर येथे एका मालकाने खंडणी दिली नाही म्हणून मालकाला धमकावण्यासाठी त्याच्या रायफलधारी अंगरक्षकालाच आयर्न टोळीतील गुंडांनी गोळय़ा घातल्या होत्या. त्याच कूटनीतीचा वापर रवी पुजारीने केला. व्यावसायिकांना धमकावण्यासाठी रवी पुजारीने मुंबई शहरात प्रथम हवेत गोळीबार करून आपली दहशत निर्माण केली. तरीही कुणी त्याची दखल घेईना म्हटल्यावर परदेशात लपलेल्या या गुंडाने एकेकाळी लेडीज बारमुळे (दीपा बार, विलेपार्ले) नावारूपाला आलेले व सध्या बांधकाम व्यवसायात आघाडीवर असलेले सुधाकर शेट्टी यांना खंडणीसाठी धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी रवी पुजारीच्या धमक्यांना भीक न घातल्यामुळे या गुंडाने अंधेरी (पश्चिम) आंबोली येथील सुधाकर शेट्टी यांच्या साइटवर असणाऱ्या सम्राट देवर्षी (२८) व योगेश खुळे या दोन साइट इंजिनीयरना आपल्या शूटरना गोळय़ा घालण्यासाठी सांगितले. त्यातील एका (मयत) तरुणाचे नुकतेच लग्न झाले होते. कोणताही दोष नसताना दोन तरुणांचा रवी पुजारीने बळी घेतला. यात कोणते आले शौर्य? दाऊदचा भाऊ अनीसच्या शूटरनीही तेच केले. बिल्डर मनीष ढोलकिया याचा अंगरक्षक अजीत येरुणकर यास मरिन लाईन्स येथे गोळय़ा घातल्या.

सात-आठ वर्षांपूर्वी मुंबई शहरातील रवी पुजारीचा वाढता आतंक मुंबई पोलिसांसाठी एक मोठे आव्हान होते. पोलिसांच्या चकमकी थंडावल्यामुळे गुंड माजले होते. त्यात रवी पुजारी टोळी आघाडीवर होती तर मुंबई क्राइम ब्रँच हतबल झाली होती. रवी पुजारीचे ‘लोकेशन ट्रेस’ होत नव्हते. तरीही हिमांशू रॉय, सदानंद दाते, देवेन भारती या धडाडीच्या आयपीएस अधिकाऱ्यांनी व्यावसायिक व सिने निर्मात्यांना धमकावणाऱ्या रवी पुजारीच्या बऱ्याच गुंडांना मुंबईत जेरबंद केले. काहींना चकमकीत ठार मारले. त्यामुळे मुंबईतील रवी पुजारीच्या कारवाया थंडावल्या. परंतु ठाणे, नवी मुंबई येथे वाढल्या. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक, हॉटेल मालक सोडा अगदी लोकप्रतिनिधींनाही रवी पुजारी खंडणीसाठी धमकावू लागला. तेव्हा ठाण्याचे डायनामिक पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या टोळीच्या नांग्या ठेचल्या. रवी पुजारी टोळीतील एक डझनच्यावर गुंडांना प्रदीप शर्मा या धडाकेबाज अधिकाऱ्याने अलीकडे अटक केली असून ठाण्यातून रवी पुजारी टोळी समूळ नष्ट करण्याचा निर्धार प्रदीप शर्मा यांनी केला आहे. परंतु रवी पुजारी व आता सुरेश पुजारीसारख्या खंडणीखोर टोळय़ा वाढतातच कशा? याला जबाबदार कोण? आपण अतिरेक्यांचे, नक्षलवाद्यांचे समूळ उच्चाटन करू शकत नाही कारण त्यांची पाळंमुळं घट्ट आहेत असे सांगितले जाते. परंतु काल-परवाच्या किरकोळ खंडणीखोर टोळय़ाही पोलिसांची दमछाक करीत असतील, निरपराधांचे बळी घेत असतील तर त्या गुंडांना आता कुणाचीच भीती राहिलेली नाही हे उघड होते. जेलमधून बाहेर पडलेल्या तरुणांच्या हातावर पाच-दहा रुपये टेकवून व्यावसायिकांवर गोळीबार करणाऱ्या रवी व सुरेश पुजारीसारख्या नामर्दांच्या टोळय़ा वाढू लागल्या तर उद्या सामान्य माणसांचेही जगणे मुश्कील होईल हे लक्षात ठेवून राज्यकर्त्यांनी उपाययोजना केली पाहिजे. नाहीतर वाढलेल्या या पुजारी टोळींचा भस्मासुर उद्या सर्वांचीच डोकेदुखी ठरेल हे लक्षात ठेवा. नुसत्या फांद्या छाटून चालणार नाही, झाडच मुळासकट उखडून टाका. रवी पुजारी व सुरेश पुजारी या दोन भस्मासुरांना मुंबईत आणा. छोटा राजन टोळीतून फुटलेल्या रवी पुजारीने स्वतःचे खंडणी वसुलीचे संस्थान उभे केले ते वाढविले. आता रवी पुजारी टोळीतून फुटून सुरेश पुजारीने आपले नवीन दुकान उघडले आहे. प्रत्येक गुंडाच्या खंडणीखोरीचा हा विस्तार समाजाच्या हिताचा नक्कीच नाही.

मुंबई क्राइम ब्रँचचे सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, उपायुक्त दिलीप सावंत या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकातील अजय सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी भिवंडीची स्वरा शिरसाट हल्ला प्रकरणातील सुरेश पुजारी टोळीतील शूटरना अटक करून सुरेश पुजारीला हादरा दिला आहे. ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. परंतु अलीकडे पुजारी टोळींची विस्तारलेली खंडणी वसुलीची ही दुकाने पोलिसांनी कायमची बंद करावीत अन्यथा उद्या याच नामर्दांच्या टोळय़ा सर्वांचे जीणे मुश्कील करतील.