प्रभास आणि अनुष्काचा डिसेंबरमध्ये साखरपुडा, चित्रपट समीक्षकाचा दावा

सामना ऑनलाईन, मुंबई

दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरहिट जोडी प्रभास आणि अनुष्का शेट्टीचा डिसेंबरमध्ये साखरपुडा असल्याचा दावा एका चित्रपट समीक्षकाने केला आहे. बाहुबलीचा पहिला आणि दुसरा भाग प्रदर्शित झाल्यापासून ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.

चित्रपट बघून आल्यानंतर या दोघांचं खरोखर लग्न झालं तर किती मस्त होईल ना अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत होत्या. या दोघांचं प्रेमप्रकरण सुरू असल्याच्याही खमंग चर्चा झाल्या मात्र प्रभासने सध्या आपला लग्नाचा विचार नसल्याचं सांगितलं. त्यानंतर प्रभास त्याच्या कुटुंबाच्या परिचयाची आणि इंजिनिअर असलेल्या मुलीबरोबर लग्न करणार आहे अशा बातम्या आल्या. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे आणि आता दोघे वेगळे झालेत असंही बोललं जाऊ लागलं. मात्र उमर संधू नावाच्या चित्रपट समीक्षकाने छातीठोकपणे दावा केलाय की हे दोघे डिसेंबरमध्ये साखरपुडा करणार आहेत आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.

 

बाहुबलीच्या अविश्वसनीय लोकप्रियतेनंतर प्रभासला ६ हजार मुलींनी लग्नाची मागणी घातली होती. मात्र या सगळ्यांना त्याने नकार दिला होता. तेलुगू चित्रपट बिल्लामध्ये प्रभास आणि अनुष्काने सगळ्यात पहिल्यांदा काम केलं होतं. त्यानंतर मिर्ची आणि बाहुबलीच्या दोन्ही भागात ही जोडी दिसली होती.