आज पाडवा…नात्यातील गोडवा…

आज पाडवा. खास पती-पत्नीच्या नात्याचा दिवस. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर सांगताहेत या सुंदर नात्याविषयी… 

या जगात कोणतं नातं खरं… कोणतं नातं सगळ्यात जवळचं…

मुळात एकमेकांना अपरिचित असणाऱ्या दोन व्यक्ती देवाच्या, कायद्याच्या साक्षीने एकत्र येतात… आणि एकमेकांच्या सहवासाने, साथीने या नात्यातील गोडवा वाढवतात. आमची ओळख ही १९७० सालच्या आसपास झाली आणि तेव्हा आम्ही नाटय़शिबीर करत होतो. दरम्यान आमची चांगली ओळख झाली आणि तिला लग्नाबद्दल विचारले. आमचे लग्न ठरले. जेव्हा लग्न ठरवलं तेव्हा मला नोकरी पण नव्हती पण जे काही पुढे होईल त्याला साथ द्यायला तिची तयारी होती.

आमच्या घरी जेव्हा लग्न होऊन ती आली तेव्हा माझे वडील निवृत्त झाले होते. मला नोकरी नव्हती. आई अपंग होती आणि तिही निवृत्तीला आली होती. त्यामुळे घरात फारसं काही उत्पन्न नव्हतं. नव्या नवरीच्या लग्न होऊन आल्यावर अनेक अपेक्षा असतात. तिच्याही असतील. पण त्याची कधीच तिने तक्रार केली नाही. तीही अभिनेत्री आहे. ती लहानपणापासून अनेक नाटकात कामे करायची. नाटकासाठी, सिनेमासाठी, आकाशवाणीसाठी तिला बऱ्याच ठिकाणी मागणी होती. तिला वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी विचारले होते. पण माहेरी तिला त्याबाबत फारसे प्रोत्साहन मिळाले नाही. त्यानंतर मला जेव्हा व्यावसायिक नाटके मिळाली तेव्हा तिने पहिल्यांदा सांगितले की तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे लक्ष द्या घरची जबाबदारी मी सांभाळेन. नंतर तिला शाळेमध्ये नोकरी मिळाली. पण कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे तिने ठरवले होते. घर, नोकरी आणि वेळ उरला, त्यातून काही ऑफर आली तर नाटक असे तिने ठरवले होते. त्यानंतर ती नोकरी आणि नाटक दोन्ही बऱ्यापैकी स्थिरावली. सगळंच अगदी नवीन होतं, नाटक आणि नोकरी दोन्हीही टिकवून धरणं हे जास्त महत्वाचं होतं. त्या माझ्या धावपळीमध्ये ती आमच्या सबंध कुटुंबाची समर्थपणे जबाबदारी सांभाळत होती. ती आजतागायत. फावल्यावेळात तिला काही करता आले की ती करायची.

तिच्यामुळे लोकांसमोर

मी आणि माझ्या मुली लोकांसमोर जी काही कामे करत आहोत ते केवळ तिच्यामुळे. मागचा जो ड्रायव्हिंग फोर्स म्हणतात तो सगळा माझी रजनी आहे. कदाचित माझ्या आई वडिलांकडून तिला ही प्रेरणा मिळाली. माझी कामं सुरू होती त्याच दरम्यान रजनी पण एका नाटकात काम करत होती आणि मिराला आमच्या नटसम्राटमध्ये ठमीचे काम करण्याबाबत विचारणा झाली. तर सगळं तपासून झाल्यावर तिच्यासोबत जायला आम्ही दोघंही मोकळे नव्हतो. तेव्हा तशी ती लहानच होती, अशावेळी माझे आई-बाबा आम्हाला बोलले आम्ही आहोत ना तुम्ही काळजी करू नका. अशावेळी दोघंही तिचे जिथे-जिथे प्रयोग असायचे तिथे तिच्यासोबत जायचे. सतत मिरासोबत असायचे. नागपूर, पुणे, दिल्ली असे वेगवेगळे दौरे केले होते. हेही प्रेरणादायी असते.

साथीदाराचा विचार करा

साथीदाराला समजून घेणे, त्याचा आदर करणे. चारचौघांत साथादारावर ओरडू नये. पण हे तुम्हाला एकमेकांविषयी आदर असेल तर येते. प्रत्येकाने आपली एक व्यक्ती म्हणून त्याच्याही मनाची जाण असमे सगळ्यात महत्वाचे आहे. संसार म्हटला की रूसवे फुगवे, वादविवाद आलेच. पण त्यातही आपला संसार गोडी कशी वाढेल याकडेच लक्ष द्यायला हवे. आपल्या साथीदाराला समजून घेणं. त्याची आवड-निवड लक्षात घेणं. त्याच्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींचे कौतुक करणे.

तिचं भोवती असणंच प्रेरणादायी

आजही तिचं आमच्याभोवती फक्त असणंही आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि तिचा आधार आहे. ती स्वयंपाक चांगला करते, सगळ्यांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवते आणि कधी एखादा पदार्थ बरेच दिवस बनला नाही असे बोललो तरी लगेच दुसऱ्या दोन दिवसात तो पदार्थ ताटात असतो. अगदी न सांगता. तिचा हाच स्वभाव मला जास्त भावतो.

तिची हौस बाजूला ठेवली

तिने माझ्यासोबत एका मालिकेत काम केले होते. ती हौस म्हणून पाच-सहा दिवस, महिन्याचे काम असेल तर स्वीकारते. नाटक, सिनेमा याच्या ऑफर्स आल्यावर त्या नाकारणे हेही एका कलाकारासाठी खूप कठीण असतं याची मला जाणीव आहे. कलावंत म्हणून मी ते पूर्णपणे जाणतो. खरं तर ते खूप कठीण आहे. पण तिने तिची हौस कायम बाजूला ठेवली.

घरची चिंता वाटली नाही

मला घरची चिंता कधीच सतावली नाही. शंकासुद्धा कधी आली नाही काय झाले असेल आणि काही नाही. सगळं घर तिने समर्थपणे सांभाळले. माझ्या आई-वडिलांच्या वयानुसार जेव्हा हालचाली कमी झाल्या तेव्हाही तिने आधी त्यांनाच प्राधान्य दिले. तिची ही गोष्ट मला भावली.