लेख : संत कबीरांचे आक्रमक तत्त्वज्ञान

>>प्रज्ञा कुलकर्णी<<

[email protected]

कर्मकांड करून हाती काही लागत नाही. हे सारे केवळ फसवे शब्द आहेत. त्यापेक्षा मानवता, मेहनत आणि ज्ञानसाधना श्रेष्ठ आहे असे कबीर सांगतात. कबीरांचे तत्त्वज्ञान बंडखोर आणि आक्रमक आहे. सत्य परिस्थिती स्पष्ट करणारे आहे. शब्दांचा कबीरांनी शस्त्राप्रमाणे वापर करून सामान्य माणसांना फसवणाऱ्या आणि स्वतःला भगवंताचे अवतार मानणाऱ्या ढोंगी, साधू, बैरागी अशांचे पितळ उघडे पाडले आहे.

आपल्या देशातील प्रत्येक प्रांताला श्रेष्ठ संतसत्पुरुषांची परंपरा आहे. अशा प्रांतोप्रांतीच्या संतपरंपरेत उत्तर प्रदेशातील एक श्रेष्ठ संत म्हणून संत कबीर यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. महाराष्ट्रात संत तुकाराम जसे सडेतोड कवी आणि तत्त्वज्ञानी म्हणून ओळखले जातात  तसेच कबीरदेखील स्पष्ट,  सडेतोड कवी आणि तत्त्वज्ञानी म्हणून ओळखले जातात. एक संत आणि थोर समाजसुधारक म्हणून कबीरांना उत्तर प्रदेशात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

कबीरांचा काळ हा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील गोंधळाचा, अस्थिरतेचा काळ होता. मोगल आणि इंग्रजांनी केलेले आक्रमण, समाजात धर्ममार्तंडांनी माजवलेले जातपात, उच्चनीच, कर्मकांड,  अंधश्रद्धा यांचे स्तोम आणि अन्याय, अत्याचार, पिळवणूक या सगळ्यात भरडला गेलेला सर्वसामान्य पापभिरू माणूस अशी त्या काळची विदारक परिस्थिती होती. अशा काळातील तथाकथित उच्चवर्णीय विद्वान पंडितांवर आणि फसव्या कर्मकांडांवर आपल्या मार्मिक आणि सडेतोड भाषेतून आसुड ओढताना कबीर म्हणतात –

जो पै करता वरण विचारै

जो जनमत तीन डांडि करि सारै

नही कोई उंचा नही कोई नीचा

जाका प्यंड ताहिका सिंचा

मानवी जीव कुठल्याही जातीचा, भाषेचा अथवा वर्णाचा असो, सारे सारखेच आहे. प्रत्येक मानवी जीवात एकच निर्गुण निराकार अशा परमेश्वराचे अस्तित्व नांदते आहे असे कबीरांचे मत होते. त्यांना जात आणि धर्मव्यवस्था मान्य नव्हती. कर्मकांड, तीर्थयात्रा, अंधश्रद्धा यांनादेखील कबीरांचा विरोध होता.

तिरथ व्रत जपै तप करि करि

बहुत भांती हरी सौंधे

तुरकी धरम बहुत हम खोजा

बहु वजागार करे बोधा

तीर्थयात्रा, कर्मकांड करून हाती काही लागत नाही. हे सारे केवळ फसवे शब्द आहेत. त्यापेक्षा मानवता, मेहनत आणि ज्ञानसाधना श्रेष्ठ आहे असे कबीर सांगतात. कबीरांचे तत्त्वज्ञान बंडखोर आणि आक्रमक आहे. सत्य परिस्थिती स्पष्ट करणारे आहे. शब्दांचा कबीरांनी शस्त्राप्रमाणे वापर करून सामान्य माणसांना फसवणाऱ्या आणि स्वतःला भगवंताचे अवतार मानणाऱ्या ढोंगी, साधू, बैरागी अशांचे पितळ उघडे पाडले आहे. कबीरांनी सर्वसामान्य प्रापंचिकांना आपल्या सहजसुंदर भाषेतून जीवन आणि परमार्थ याविषयी मार्गदर्शन केले आहे. कबीरांनी कर्मकांड, दुष्ट चालीरीती,  अंधश्रद्धा,  जातीयवाद यांना कठोर विरोध करत आत्मचिंतन,  संयम, शूचिता, ज्ञानसाधना, नामस्मरण यावर विशेष भर दिला आहे. मोक्षप्राप्तीसाठी प्रत्येक जीवाने ज्ञान, कर्म आणि भगवंतभक्तीचा निष्ठsने अवलंब केला पाहिजे असे कबीरांनी ठासून सांगितले आहे. संत कबीर निरक्षर होते. कबीर स्वतःविषयी सांगताना म्हणतात –

मसि कागद छुयो नही

कलम नही गट्टी हाथ

चारिऊ जुरा को महातम

मुखदि जनाई बात

मी शाई आणि कागद यांना कधी स्पर्शसुद्धा केला नाही. लेखणी कधी हातात धरली नाही परंतु गुरुकृपेने मी जे काही जीवनाचे सार, उद्देश सांगितले ते केवळ तोंडीच सांगितले आहे.

कबीर एक साधे विणकर होते. तोच त्यांचा पिढीजात व्यवसाय होता. कबीर सुंदर,  सुंदर शेले, शाली विणत असत आणि विणता विणताच त्यांनी जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान तितक्याच सुंदरतेने, सहजसुलभतेने शब्दांतून विणले. संत कबीरांचे वर्णन करताना संत एकनाथ महाराजांनी म्हटले आहे-

विठू पंढरीचे राणे

त्याले भक्तांची भूषणे ।।

कासे कसीला पितांबर

तो हा जाणावा कबीर ।।

आपल्या मराठी संतांनी कबीरांना आपले मानले आहे आणि आपल्या वैष्णव संप्रदायात सहजपणे समावून घेऊन त्यांना मानाचे स्थान दिले आहे. कारण कबीरांनी मराठी संतांप्रमाणे धर्म, जातीनिरपेक्ष, मानवतावादी आणि पारमार्थिक तत्त्वज्ञान आपल्या काव्यातून आणि साहित्यातून रोखठोकपणे मांडले आहे.