प्रद्मुम्नच्या हत्येची होणार सीबीआय चौकशी

सामना ऑनलाईन । गुरुग्राम

गुरुग्राममधील रयान इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता दुसरीतील विद्यार्थी प्रद्मुम्न ठाकूर (७) याच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केंद्र सरकारला हरयाणा सरकार करणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज केली.

प्रद्मुम्नला आदरांजली अर्पण करण्यासाठी आज येथे आयोजित केलेल्या शोकसभेत खट्टर यांनी ही घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रद्मुम्नचे आई-वडील ज्योती व वरुण ठाकूर यांचे सांत्वन केले. या हत्येबाबत जनतेच्या भावना या अतिशय तीव्र आहेत. यामुळे या हत्येची सीबीआयमार्फत चौकशी करण्यास सरकार तयार आहे, यासंदर्भात सरकारतर्फे सीबीआयला एक पत्रही पाठवण्यात आलेले आहे, असे मुख्यमंत्री खट्टर यांनी सांगितले.

रायन दुर्घटनेनंतरशाळेवर तीन महिने सरकारचा ताबा
रायन स्कूल विरोधात पालकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने ही शाळा तीन महिन्यांसाठी ताब्यात घेण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. या काळात या शाळेतील सर्व हालचाली आणि घडामोडींवर सरकारची नजर राहील, असे खट्टर यांनी सांगितले.