इवल्याशा कौतुकाचा मोठ्ठा आनंद

<<डॉ. विजया वाड>>

वामनकाकांचा सिंधूताईंना हेवा वाटायचा. किती लोक त्यांना चाहतात. दुकानात गेलं तरी लोक विचारतात, ‘पुष्कळ दिवस वामनकाका नाही दिसले?’ मग सिंधूताईंचे नाक फुगायचे.

‘मी आले सामान आणायला तर डोळय़ात खुपले का रे तुला?’

‘तसं नाही हो काकू… आपली चौकशी केली. काका दिसले की, कसं बरं वाटतं!’

‘म्हंजे मी दिसले की बुरं वाटतं?’

‘तुम्ही तर कायतरीच बोलता काकू! पराचा कावळा येकदम्! मी आसं म्हणालो का? सांगा!’

‘आता तू म्हणाला नाहीस तरी तुझ्या बोलण्यातला दडलेला भाव कळतो ना रे मला…’ त्या मनातच म्हणायच्या नि मग हवी ती वस्तू घेऊन यायच्या.  अहो, तुमच्यात अशी काय जादूय हो? टकलू आहात, तोंडाचं बोळकंय. तरी लोक आपले तुम्हालाच पुसतात! वामनकाका कुठायत…

‘अगो, मी शुभेच्छुक आहे ना सर्वांचा!

‘म्हंजे? मी नाही समजले.’ सिंधूताई म्हणाल्या.

‘माझा निश्चय आहे तो. रोज किमान पाच लोकांना खुश करायचे.’

‘म्हंजे खुशमस्कऱया…’

‘तसं म्हण. ?ुझी मर्जी! पण मी स्वतःला खुशमस्कऱया नाही, शुभेच्छुक म्हणतो बरं का.’

‘कोणाला देता शुभेच्छा? बायकांना?’ सिंधूताईंनी डोळे बारीक केले.

‘देतो की, बाई-?ुरुष भेदाभेदाचे वय मागे पडले.    ‘हो का? साठी बुद्धी नाठी म्हणतात इतर.’

‘बोलनेवाले को बोलने दो गं! आपुन मस्त जीनेका!’

‘हो का? मला तर काहीच मस्त वाटत नाही… या वयात। कंबर दुखते, पोटऱया तुणतुण करतात. स्वयंपाकघराचा नि कधी कधी तुमचाही वीट येतो.’

‘ऐक! बरं झालं व्यक्त झालीस ते! मी रोज इतरांना शुभेच्छा देतो. बागेत चालणाऱया मैत्रीतल्या बायकांना, वा! आज किती ताज्यातवान्या दिसताय तुम्ही… म्हटलं की, खुलतात त्या. ?ाजीवालीला, भाजी घ्यावी तर तुझ्याकडचीच गं सरू असं म्हटलं की, ती प्रसन्न होते. ‘कैलाश, आपके लस्सी का जवाब नही. दिल जीत लिया तुने असे म्हणतो मी कधी कधी. अगं बरं वाटतं त्यांना, पण आज पाचही शुभेच्छा आमच्या बायकोबाईसाठी!’

आता सिंधूताई ऐकण्यासाठी उत्सुक होत्या.

‘आज शुक्रवार. आपण ‘रंगून’ बघायचा!’

‘क्काय?’ ‘हो! नंबर वन पिक्चर, नंबर टू आईस्क्रीम.’

‘वाऊ…’

‘नंबर तीन बाहेर जेवण, नंबर चार बनारसी मीठा पान नि…’ ‘सांगा ना हो… नंबर पाच काय?’

‘घरी आल्यावरचं सेन्सॉर गं!’ ‘इश्श!’

‘गोड दिसत्येस अजुनी. हे सहावं हं चुकून.’ वामनराव हसले. सिंधू खुशम खूश. प्रिय वाचकांनो, शुभेच्छा नि छोटे आनंद मोठं सुख घेऊन येतात हे कध्धी विसरू नका.