ओबीसींना वंचित ठेवण्याचा काँग्रेसचा डाव सफल होऊ देणार नाही!

2

सामना प्रतिनिधी । नांदेड

‘स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातील ओबीसींना सातत्याने वंचित ठेवण्याचा डाव काँग्रेसने सतत आखला आहे आणि निवडणुकांमधून तो दाखवूनही दिला आहे. परंतू आता वंचित बहुजन आघाडी काँग्रेसचा हा डाव उलथवून पाडल्याशिवाय राहणार नाही’, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी नांदेड येथे आपला निर्धार व्यक्त केला.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेडला मोंढा मैदानावर सत्ता संपादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते.

‘देशात भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यानंतर आपल्यावर दोन व्यवस्था लादल्या आहेत. पैकी एक संविधानाने दिलेली राष्ट्रपतीची व्यवस्था आहे आणि दुसरी आहे मोहन भागवत यांची. या दोन व्यवस्थेपैकी मोहन भागवत यांच्या व्यवस्थेपासून देशाची मुक्तता करण्यासाठी आपण धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणू, असे मी काँग्रेसच्या नेत्यांना परोपरीने सांगितले, परंतू त्यांना ते पटले नाही. आता ही व्यवस्था फेकून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली असून, आता ओबीसी आणि बहुजन यांचे राज्य आल्याशिवाय राहणार नाही’, असेही बाळासाहेब म्हणाले.