जरा हटके : रेखाटनाचा छंद

3

>> प्राप्ती जोशी 

सगळ्यांना काही ना काही छंद असतो. तो छंद पुरा करायला मिळाला नाही, तर त्रास होतो. ते करायला मिळाल्यावरच मन शांत होतं. मलाही असाच एक छंद आहे. रेखाटण्याचा… लहान होते तेक्हा जिकडेतिकडे नुसती रेखाटत बसायचे. त्यावरून मी कितीतरी वेळा आईचा ओरडाही खाल्ला आहे. कधी रेखाटायला मिळालं नाही तर कशातच लक्ष लागायचं नाही. हा छंद चित्रकलेचा होता हे मला नंतर कळलं. अर्थात पूर्ण चित्रकला नसली तरी ती रेखाटनाची आवड होती. रेखाटन करतानाच मला वेगवेगळ्या नवीन कल्पना सुचत असतात.

रेखाटनाच्या आवडीमुळेच मी दोन वर्षे चित्रकलेचा क्लासही केला. त्यातून बरंच काही शिकायला मिळालं. माझ्या नुसत्या रेखाटत बसण्याला अर्थ आला. काहीतरी चांगलं रेखाटण्याचा त्यानंतर मी प्रयत्न करायला लागले. आता दहावीत असल्यामुळे माझ्या अभ्यासाकडे मी लक्ष देतेय. कारण दहावीत चांगले मार्क मिळवणं खूप गरजेचं आहे ना… माझ्या छंदाचा फायदा झाल्याचं एक उदाहरण म्हणजे माझ्या ताईचा नुकतीच 18 वा वाढदिवस झाला. तिला काय गिफ्ट द्यावे या विचारात मी होते. पण त्याच विचारात असताना मी तिचे एक सुंदर चित्र रेखाटले. अचानक माझ्या हातून ते घडून गेलं होतं. ते चित्र पाहून ताई तर खूषच झाली. तिचं इतकं सुरेख चित्र तिला कधीच मिळालं नव्हतं. त्यानंतर आईलाच छंद लागला… कोणाचाही वाढदिवस असेल तर मला त्या नातलगाचं चित्र काढायला सांगायला लागली. माझ्या काका-काकूंच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला मी त्यांना पहिल्यांदा कॅनव्हासवर चित्र काढून दिलं तेव्हा त्यांना माझं खूप कौतुक वाटलं. दहावीच्या परीक्षेनंतर माझा छंद जोपासायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. यातच करीयर करता आले तर तेही बघणार आहे.

वेगळ्या वाटेवरचे छंद तरुणाईला नेहमीच खुणावतात. आपला अभ्यास सांभाळून निवडलेली वेगळी वाट आम्हालाही सांगा… छायाचित्रासहित.

आमचा पत्ता : Gen Next, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन,

नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-25

[email protected] वरही पाठवता येईल.