लेख: व्हॉटस् अॅपवरचे  ‘भित्रे ससे’ आणि  ‘डॅम्बिस कोल्हे’!

>>प्रसाद शिरगावकर<<

[email protected]

आधुनिक व्हॉटस् अॅप ‘इसापनीती’च्या कथेत ‘कहानी में एक ट्विस्ट’ असतो. इथे फक्त भित्रे ससे नसतात, इथे काही डॅम्बिस कोल्हे पण असतात. हे कोल्हे एखादी खरी बातमी, खरी घटना घेतात आणि त्यात धर्म, जात, भाषा, पंथ किंवा राजकीय पक्षाविषयीच्या खोटेपणाची बेमालूमपणे सरमिसळ करतात. त्यामुळे व्हॉटस् अॅपचा वापर डोळे उघडे ठेवून अत्यंत जबाबदारीने करणंही गरजेचं आहे. व्हॉटस् अॅप वापरताना आपण भित्रा ससा व्हायचं, डॅम्बिस कोल्हा व्हायचं की खर्‍यापासून खोटं आणि घटनेपासून विद्वेषाची फोडणी वेगळी करू शकणारं राजहंस व्हायचं हे आपल्या हातात असतं. 

‘इसापनीती’मधली भित्र्या सशाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल. एकदा एक ससा निवांत डोळे मिटून बसलेला असताना त्याच्या अंगावर झाडाचं एक मोठं पान पडतं. ससा दचकून जागा होतो. पान इतकं मोठं असतं की, ससा पूर्ण झाकला जातो. त्याला डोक्यावर आभाळच दिसत नाही. ससा घाबरतो. त्याला वाटतं आभाळच कोसळलं. मग तो ‘‘पळा पळा, आभाळ कोसळलंय’’ असं ओरडत सैरावैरा धावत सुटतो.

त्याला तसं ओरडत धावताना बघून इतर ससेही घाबरतात आणि सगळेच जण ‘‘आभाळ कोसळलंय, आभाळ  कोसळलंय’’ असं ओरडत सैरावैरा धावायला लागतात.

‘इसापनीती’तले भित्रे ससे हल्ली व्हॉटस् अॅपवर असतात. आपल्या मोबाईलवर कोसळणीर्‍या ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड नाईट’च्या पानाफुलांपासून ते इतर हजारो उपयोगी-निरुपयोगी मेसेजेस अहोरात्र रवंथ करत बसलेले असतात. हे करत असताना अचानक एखाद्या ‘ब्रेकिंग न्यूज’ टाईप सनसनाटी मेसेजचं पान मोबाईलवर धाडकन येऊन आदळतं.

‘टिंबक्टूत भूकंप’, ‘झांझिबारमध्ये त्सुनामी’, ‘चंद्रावर चक्रीवादळ’ असं काहीही प्रकारचं सनसनाटी पान असतं हे. ससे घाबरतात. आपल्या मोबाईलवरचं पान आपल्या कॉण्टॅक्ट लिस्टमधल्या सगळ्यांच्या पाठीवर क्षणार्धात फॉरवर्ड करून टाकतात. मग काही क्षणांत सारे ससे ‘आभाळ कोसळलंय, आभाळ कोसळलंय’ असं वाटून सैरावैरा धावायला लागतात आणि संपूर्ण ससा समाजात एक मोठ्ठं पॅनिक तयार होतं.

आपल्या पाठीवर काहीतरी पडल्यावर ते पान आहे की आभाळ याचा ‘इसापनीती’तल्या सशानं दोन क्षण विचार केला असता, काय पडलंय ते डोळे उघडे ठेवून तपासून बघितलं असतं तर अर्थातच तो पॅनिक झाला नसता आणि इतरांनाही सैरभैर केलं नसतं

‘इसापनीती’तल्या सशाला जे जमलं नाही ते व्हॉटस् अॅप वापरणारे आपण सारे जण करू शकतो. व्हॉटस् अॅप वापरताना आपण थोडं अधिक सावध राहून, थोडं जागं राहून, डोळे उघडे ठेवून ते वापरू शकतो.

पहिली गोष्ट अशी करावी की, कोणताही महत्त्वाचा वाटणारा, ‘ब्रेकिंग न्यूज’ असणारा, काहीतरी भीषण घडलंय, घडतंय, घडणार आहे असं सांगणारा  कोणताही मेसेज आपल्या व्हॉटस् अॅपवर येऊन कोसळला की, त्यावर डोळे झाकून विश्वास न ठेवणं. असा कोणताही मेसेज वाचून आधी स्वतः न घाबरणं, पॅनिक न होणं.

हे जमायला लागलं की, मग दुसरं पाऊल उचलावं. ते म्हणजे आलेल्या मेसेजचा, बातमीचा खरेखोटेपणा तपासणं. हे वाटतं तितकं अवघड नाही. जी बातमी आली आहे तिच्याबद्दल गुगलला सर्च केलं की, अक्षरशः काही सेकंदांत तिचा खरेखोटेपणा समोर दिसतो. म्हणजे ‘टिंबक्टूत भूकंपाने हाहाकार’ असा मेसेज आला आणि तुम्ही गुगलवर ‘टिंबक्टू’ असं टाईप करायला लागलात तर खरोखर भूकंप झाला असेल तर त्याच्या पानभर बातम्या दिसतात. नसेल तर (बहुसंख्य वेळा) ‘टिंबक्टूतल्या भूकंपाची बातमी खोटी आहे’ असं सांगणार्‍या लिंक्स दिसायला लागतात. कोणतीही महत्त्वाची वाटणारी बातमी किमान दोन-चार स्वतंत्र आणि प्रतिष्ठत वर्तमानपत्रांच्या साईटवरून किंवा त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून तपासून पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये.

हे करत बसायला तुम्हाला वेळ नसेल तर स्वतःला स्वतःपुरता एक अत्यंत काटेकोर नियम घाला. नियम असा की, कोणत्याही महत्त्वाच्या वाटणार्‍या बातमीचा खरेखोटेपणा जर मी स्वतः तपासला नसेल तर ती बातमी मी पुढे कोणालाही पाठवणार नाही. कारण तुम्ही स्वतः पॅनिक झाला नसाल, पण ती बातमी वाचून पॅनिक होणारे खूप जण असू शकतात. त्यामुळे ज्या बातमीची सत्यता आपण पडताळून पाहिलेली नाही, ती पुढे न पाठवणं हे सर्वात उत्तम.

हे पहिले दोन टप्पे आपल्याला जमायला लागले की, मग तिसर्‍या टप्प्यावर जावं. तिसरा टप्पा म्हणजे एखादी बातमी व्हॉटस् अॅपवर आली. ती आपण तपासल्यावर खोटी आहे असं कळलं की, ज्यानं ती पाठवली आहे त्याला उलट उत्तर देऊन ‘ही खोटी बातमी आहे, अफवा पसरवू नका’ असा मेसेज पुराव्यांच्या लिंक्ससह पाठवणं.

हे तिन्ही टप्पे आपल्याला जमायला लागले की,व्हॉटस् अॅपवर येणारं कोणतंही अफवारूपी पान आपल्याला भित्रा सैरभैर ससा बनवू शकत नाही.

एक गंमत अशी आहे की, आधुनिक व्हॉटस् अॅप ‘इसापनीती’च्या कथेत ‘कहानी में एक ट्विस्ट’ असतो. इथे फक्त ससे नसतात, इथे काही डॅम्बिस कोल्हे पण असतात.

हे कोल्हे एखादी खरी बातमी, खरी घटना घेतात आणि त्यात धर्म, जात, भाषा, पंथ किंवा राजकीय पक्षाविषयीच्या खोटेपणाची बेमालूमपणे सरमिसळ करतात. म्हणजे ‘टिंबक्टूत भूकंप’ ही बातमी खरी असते. ते ती बातमी बदलून ‘टिंबक्टूत अमुक पक्षामुळे भूकंप’ अशी करतात किंवा ‘झांझिबारमधल्या सुनामीत तमुक धर्माच्या लोकांचं नुकसान’, ‘चंद्रावरच्या चक्रीवादळात तमुक जातीवर अन्याय’ असं.

कोणतीही खरी बातमी, खरी घटना घेऊन त्याला कोणत्याही लोकांच्या भावना भडकवणार्‍या गोष्टींची फोडणी मारणं हे या कोह्यांचं काम असतं आणि अशी फोडणी मारलेली खर्‍याखोटय़ा बातम्यांची पानं सशांच्या पाठीवर भिरकावत बसणं हा त्यांचा छंद असतो.

आपण डोळे उघडे ठेवून व्हॉटस् अॅप वापरत असलो तर कोणत्याही घटना, बातमीची सत्यासत्यता तपासता येते एकवेळ, पण खर्‍या बातमीला मारलेली विद्वेषाची फोडणी मात्र वेगळी काढता येत नाही. धादांत खोटय़ा बातम्यांपेक्षा विद्वेषाची सरमिसळ असलेल्या खर्‍या बातम्या जास्त धोकादायक असतात, जास्त वेगानं पसरतात आणि अफाट विध्वंस करू शकतात.

त्यामुळे व्हॉटस् अॅप वापरताना डोळे उघडे ठेवून वापरण्याइतकंच अत्यंत सावधपणे आणि जबाबदारीने वापरणंही गरजेचं आहे.

व्हॉटस् अॅप वापरताना आपण भित्रा ससा व्हायचं, डॅम्बिस कोल्हा व्हायचं की खर्‍यापासून खोटं आणि घटनेपासून विद्वेषाची फोडणी वेगळी करू शकणारं राजहंस व्हायचं हे आपल्या हातात असतं.

जे आपल्या हातात आहे ते करायला लागूया!

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)