सदानंद चांदेकर


<<प्रशांत गौतम>>

एकपात्री रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते सदानंद चांदेकर म्हणजे विनोदाचे खणखणीत नाणे होते. एकपात्रीमधून रसिकांना मनमुराद हसवत ठेवण्याचे त्यांचे कसब वेगळे होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी पोरकी झाली आहे. आपल्या  ‘हसरी उठाठेव’ यासारख्या विनोदी कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांत ते चैतन्य निर्माण करीत असत. स्मितहास्यापासून ते सातमजली हास्यापर्यंत त्यांनी रसिकांना सतत खिळवून ठेवले. चांदेकर प्रामुख्याने ‘हसरी उठाठेव’ या कार्यक्रमातून सर्वदूर परिचित झाले. या रंजनप्रधान विनोदी कार्यक्रमातून त्यांनी दीर्घकाळ रसिकांचे मनोरंजन केले. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयामध्ये कलाशिक्षक असलेले चांदेकर रंगभूमी, चित्रपटामध्ये लेटरिंग डिझायनिंगचे काम करीत असत. कितीतरी नाटकं आणि मराठी सिनेमांची शीर्षकं कल्पक पद्धतीने त्यांनी सजवली. मराठी सिनेमा, नाटक यांची आवड असलेला हा कलाशिक्षक लेटरिंग डिझायनिंग या कलाप्रकारातही वैशिष्टय़पूर्ण ठरला. या क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी केल्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश करून त्यातील एकपात्रीत वेगळेपण जपले, जोपासले. विनोदी विषयावर तासभर एकपात्रीचे सादरीकरण  करणे, रसिकांना सतत हसते ठेवणे, हे काम सोपे नाही, पण रसिकांना आकर्षित करण्याचे अनेक गुणविशेष चांदेकर यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. चांदेकर यांनी आपला सर्व प्रवास ‘आम्ही दिवटे’ या आत्मकथनामध्ये विस्ताराने मांडला आहे. ‘हसरी उठाठेव’ या बहुचर्चित कार्यक्रमाचे तेच लेखक आणि तेच निर्मातेही. लेखक आणि निर्माता या दोन्ही बाबी त्यांच्यासाठी परस्पर पूरकच असल्याने ते सादर करीत असलेली एकपात्री ही भन्नाटच होत असे. देश-विदेशात त्यांची ‘हसरी उठाठेव’ रंगली. शहरांपासून ते गाव पातळीपर्यंत प्रयोग झाले. एवढेच नव्हे, तर पुण्या-मुंबईतही ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकले. तब्बल दीड हजाराचा पल्ला त्यांनी पार केला होता. पुणे महानगरपालिकेतर्फे ‘पुण्याचा अभिमान’ हा सन्मान त्यांना लाभला. ‘हास्यसम्राट’ हा किताबही चांदेकर यांना प्राप्त झाला. त्यांची ही भन्नाट एकपात्री, रसिकांना सतत हसवत खिळवून ठेवण्याची जादू दीर्घकाळ स्मरणात राहील, हे नक्की.