ठसा : विजय चव्हाण

विजय चव्हाण

>>प्रशांत गौतम

मराठी नाटय़रसिकांना भरभरून हसवणारी ‘मोरूची मावशी’ गेली. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे नाटक जेवढे जबरदस्त, तसेच या नाटकात मोरूच्या मावशीचे भन्नाट पात्र रंगवणारे ताकदीचे कलावंत विजय चव्हाण हेही कसदार अभिनय करणारे दमदार कलावंत. या नाटकातून त्यांनी साकारलेली मावशी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. तब्बल चार दशकं झाली तरी त्यातील वेगळेपण विजय चव्हाण प्रत्येक वेळी जपत असत. विजय चव्हाण यांच्या अकाली एक्झिटमुळे रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रांची अपरिमित हानी झाली आहे. या तिन्ही माध्यमांतून विजय चव्हाण यांनी आपल्या विविध भूमिकांतून कसदार, दमदार अभिनयाची छाप सोडली. राज्य शासनाचे चित्रपट पुरस्कार कलावंतांना नुकतेच वितरित करण्यात आले. त्यात चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विजय चव्हाण यांना त्यांच्या क्षेत्रातील भरीव योगदानासाठी प्रदान करण्यात आला. फुप्फुसाच्या विकारामुळे ते दोन वर्षांपासून आजारीच होते. पुरस्कार जाहीर झाला तेव्हाही तब्येत बरीच नव्हती. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या नावाने घोषित जीवनगौरव पुरस्काराचे त्यांना याही दुर्धर अवस्थेत अप्रूप होते. मनस्वी आनंद आणि समाधान होते. मात्र प्रत्यक्ष पुरस्कार वितरण समारंभात ते आजारामुळे उपस्थित राहण्याची शक्यताही नव्हती, मात्र दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि मायबाप रसिकांच्या प्रेमामुळे ते समारंभास उपस्थित राहिले. पुरस्काराचा स्वीकार केला. एवढेच नव्हे तर, छोटेखानी दिलखुलास भाषण करून उपस्थितांना जिंकले. याच समारंभात त्यांचे गाजलेले भाषण अखेरचे ठरले.

विजय चव्हाण यांचे बालपण गिरणगावात  गेले. शालेय शिक्षण दादरच्या इंग्रजी शाळेत झाल्यानंतर रुपारेल महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी संपादन केली. या आरंभीच्या प्रवासात सिने-नाटक क्षेत्रात काम करून करीअर करावे हे त्यांच्या मनातही नव्हते. ते महाविद्यालयात असताना सादर होणाऱ्या नाटकातील एक कलावंत आजारी पडला. त्याच्याऐवजी ऐनवेळचे कलाकार म्हणून चव्हाण यांना नाटकात काम करण्यास सांगितले. खरे तर त्यांच्यासाठी हे क्षेत्र नवीन. मात्र त्यासाठी त्यांनी दोन-तीन दिवस तालीम केली व ऐनवेळी सांगण्यात आलेली भूमिका यशस्वी  सादर केली. या पदार्पणात त्यांच्या अभिनयातील चुणूक जाणकारांच्या लक्षात आली. या क्षेत्रात आपणही चांगले काम करू शकतो असा त्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला. मात्र इथपर्यंतच्या वाटचालीसाठी त्यांना पडेल ती कामे करावी लागली. अभिनेते विजय कदम हे विजय चव्हाण यांचे वर्गमित्र. त्यांनी ‘रंगतरंग’ ही संस्था स्थापन केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी ओळख झाली. पुरुषोत्तम बेर्डे त्यावेळी ‘टुरटुर’ हे नाटक बसवत होते. त्यावेळी त्यांना लक्ष्मीकांत यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. अशा रीतीने त्यांचा या नाटकात प्रवेश झाला. याच नाटकातून चव्हाण यांना ‘हयवदन’ हे नाटक मिळाले. त्याचे देशात आणि परदेशात भरपूर प्रयोग झाले. हे नाटक बघूनच  चव्हाण यांना निर्माते सुधीर भट यांच्याकडून ‘मोरूच्या मावशी’साठी निमंत्रण आले. चव्हाण त्यावेळी मफतलाल कंपनीमध्ये नोकरी करत असत. नोकरी सांभाळून त्यांनी ‘मावशी’चे प्रयोग सुरू केले. बघता-बघता दोन हजार प्रयोगांचा उच्चांक त्यांनी गाठला. याच भूमिकेतील विजय चव्हाण यांचा स्त्री भूमिकेतील अभिनय प्रचंड गाजला. सदाबहार अभिनेते विजय चव्हाण यांची पहिली पसंती नाटय़क्षेत्र हीच होती. कशात काय लफडय़ात पाय, कशी मी राहू तशीच, कार्टी प्रेमात पडली, खोली नं. 5, झिलग्यांची खोली, जाऊबाई हळू, टुरटुर, देखणी बायको दुसऱ्याची, बाबांची गर्लफ्रेंड, मोरूची मावशी, हयवदन, श्रीमंत दामोदर पंत अशा कितीतरी दर्जेदार नाटकांतून विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या. 1985 साली प्रदर्शित झालेल्या ‘वहिनीची माया’ या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेमा क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात असे चित्रपट सुपरहिट झाले. चित्रपट गाजले आणि त्यातील त्यांचा अभिनयही लोकप्रिय ठरत तब्बल साडेतीनशे ते चारशे चित्रपटांत त्यांनी कसदार अभिनयाची छाप सोडली. रंगभूमी, मराठी चित्रपट या माध्यमातून योगदान दिल्यानंतर त्यांनी छोटा पडदाही काबीज केला. आज घराघरांत पोहचलेले हे माध्यम विलक्षण ताकदीचे असते. छोटय़ा पडद्यावरही रानफूल, लाइफ मेंबर या मालिकांत त्यांनी साकारलेल्या दमदार भूमिका गाजल्या. या तिन्ही माध्यमांतून विजय चव्हाण यांनी भरीव योगदान दिले. चाळीस वर्षे मराठी रसिक प्रेक्षकांना त्यांनी भरभरून आनंद दिला. खळखळून हसवले. ‘मोरूची मावशी’सारखा अभिनय पुन्हा आता होणे नाही. ‘मोरूची मावशी’ आता चिरंतनाच्या प्रवासाला गेली आहे.