‘वायू’मुळे गोव्यात दमदार मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात

13
goa-sea-shore-new

सामना प्रतिनिधी । पणजी

अरबी सुमद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळाने मंगळवारी दुपारी आपली दिशा बदलून ते गुजरातच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. समुद्री तुफानामुळे राज्यातील समुद्राला जोडलेल्या नद्यांतील पाण्याचा स्तर वाढला असल्याने अनेक किनाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळपासून गोव्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून पुढील पाच दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, असा अंदाज पणजी वेधशाळेने व्यक्त केला आहे.

राज्यात मंगळवारी पावसाने जोर धरला. विशेषत: सायंकाळी उशिरा किनारी भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. गोव्यापासून 350 कि. मी. आत अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळाने आणखी जोर पकडला आहे. परंतु ते पूर्वेकडे न सरकता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकू लागल्याने गोव्यावरील वादळाचा धोका टळल्याचे मानले जात आहे. हे वादळ आता गुजरातच्या दिशेने ताशी 15 कि. मी. पेक्षाही जास्त वेगाने सरकू लागले आहे. उद्या 13 जून रोजी पहाटे ते गुजरातच्या पोरबंदर ते माहुआ दरम्यानच्या वसवेळ किनारपट्टीला धडक देईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तेथून ते दीव पर्यंत पोहचेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान,अरबी समुद्रातील वादळासोबत गोव्यात मंगळवारी पावसाला प्रारंभ झाला. मात्र मान्सून अद्याप गोव्यात पोहोचलेला नाही. सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. अरबी समुद्रातील वादळाचा परिणाम म्हणून वेंगुर्लापासून पुढे पर्यंत महाराष्ट्राच्या किनारी भागावर त्याचा प्रभाव पडणार आहे. समुद्राच्या लाटा 4 ते 5 मीटर उंचीपर्यंत जातील. तसेच किनारी भागात समुद्रातील पाण्याचा स्तर बराच उंचावण्याची भीती व्यक्त केली आहे. गोवा वेधशाळेने आगामी 48 तासात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील 5 दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

मंगळवारी राज्यात सर्वत्र पाऊस झाला. सर्वाधिक 17.2 मि. मी. पाऊस सांगे मध्ये तर सर्वात कमी 1.6 मि. मी. पाऊस साखळीत झाला. म्हापसा 5.2, पेडणे 4.4, फोंडा 5.2, पणजी 6.4, वाळपई 4.1, काणकोण 10.2, दाबोळी 11.2, मडगाव 4.4, मुरगाव 9.6, केपे 7.4 तुरळक पाऊस सर्वत्र पडला.

आपली प्रतिक्रिया द्या