अवकाळी पावसाचा तडाखा; पिके व घरांचे नुकसान, वीज पडून म्हैस ठार तर तरुण जखमी

सामना ऑनलाईन, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील वाघेरा परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील कारले पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर वाघेरा येथील आरोग्य उपकेंद्रासह अनेकांच्या घराचे छपर पडून नुकसान झाले आहे. पुंडलिक लक्ष्मण हासनैक या अठरा वर्षीय युवकावर वीज पडल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच देव डोंगरा येथील दामू वाळवी यांची म्हैस वीज पडल्याने मरण पडली आहे.

जिल्हा परिषद सदस्य रूपाजली माळेकर, तहसीलदार महेंद्र पवार, आदींनी नुकसानग्रस्त पिकांची व घराची पाहणी केली. यावेळी सरपंच जयराम मोंढेंसह गावकरी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तसेच पडक्या घराचा यंत्रणेने वस्तुनिष्ठ पंचनामा करावा, पंचानाम्यापासून एकही पीडित वंचित राहणार नाही याची काळजी यंत्रणेने घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच जास्तीतजास्त नुकसानभरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे वाघेरा येथील आरोग्य केंद्राचे दोन महिन्यांपूर्वी दुरुस्तीचे काम झाले होते. त्यानंतरच्या पहिल्याच पावसात कामाचा दर्जा किती निकृष्ट आहे हे उघड झाल्याने या कामाची चौकशीची मागणी सरपंच जयराम मोंढे यांनी केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे
हिराबाई पोटीन्द्र, बुधा देशमुख, चंदर देशमुख, रमेश देशमुख, विष्णू मळेकर, भिका वडके, देऊ देशमुख, मोहन मोंढे

वाघेरा येथे कारले पिकासह दहा-बारा घरांचे नुकसान झाले असून जमिनीवरील पिकांचे व पीडित घरांच्या नुकसानीचे पंचनामे झाले असून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे.
– महेंद्र पवार, तहसीलदार