माथेरानच्या जंगलात क्रौर्याची परिसीमा, गर्भवती प्रेयसीला ८०० फूट दरीत फेकले

सामना प्रतिनिधी । कर्जत

निसर्गरम्य माथेरानच्या डोंगरावरून प्रियकराने गर्भवती प्रेयसीला ८०० फूट दरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे क्रौर्याची परिसीमा होऊनही केवळ दैव बलवत्तर म्हणून ती महिला जिवंत असून बाळही बचावले आहे. जखमी अवस्थेत तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नराधम प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रेयसीला फेकून देणाऱया प्रियकराचे नाव सुरेश पवार असून तो मंत्रालयात वाहनचालक आहे. त्याचे आणि विजयाचे प्रेमसंबंध होते. आम्ही दोघांनी मंदिरात लग्न केल्याचा दावा प्रेयसीने केला असून दोघांचाही यापूर्वी विवाह झाला आहे. तिला तीन मुले असून दोघे जण चेन्नईमधील हॉस्टेलमध्ये शिकतात. सुरेश व विजया या दोघांची ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. विजया दररोज ‘तुझ्या घरी घेऊन चल’ असा तगादा सुरेशच्या मागे लावायची. रोजच्या कटकटीला कंटाळून सुरेश तिला घेऊन फिरण्याच्या बहाण्याने माथेरानला आला. सोबत तिचा मुलगा आयानदेखील होता. माथेरान-नेरळ रेल्वे ट्रकनजीक पेब किल्ल्याजवळ दोघांमध्ये बाचाबाची झाली. मला नैराश्य आले आहे असे तो सांगू लागला. एवढेच नव्हे तर मी तुला आता फेकून देतो.. अशी धमकीही दिली. विजयाने असे करू नकोस.. मी खाली पडेन, असे वारंवार सांगितले. तरीही त्याच्या मनाला पाझर फुटला नाही. अखेर त्या नराधमाने तिला तब्बल ८०० फूट खोल दरीत कोणताही विचार न करता ढकलून दिले.

मधोमध अडकली आणि…

जखमी अवस्थेत विजया दुर्गम उभा कडा असलेल्या बेडकीची गुलई येथे मधोमध अडकली. रक्तबंबाळ अवस्थेत ती विव्हळत होती. तेथील काही स्थानिक आदिवासींनी तिचा आवाज ऐकून कडय़ाकडे धाव घेतली. तिला बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. त्या आदिवासींनी पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर काही वेळाने जुम्मापटी येथील आदिवासी तरुण, वनविभागाचे कर्मचारी तसेच सह्याद्रीमित्र माथेरान रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. खोल दरीत उतरून विजयाला सुखरूप बाहेर काढले. तिला तातडीने कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिचे बाळही सुरक्षित आहे.