चुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीमधील रनहोला येथे एका विवाहित पत्नीने चुंबन घेताना चक्क नवऱ्याची जीभ कापली असल्याची विचित्र घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेजारपाजारी चौकशी केली असता महिलेचे आपल्या नवऱ्याबरोबर सततचे भांडण व्हायचे म्हणूनच तिने असं केलं असावं, अशी माहिती मिळाली होती. मात्र नवरा चांगला दिसत नाही म्हणून संतापाच्या भरात आपण त्याची जीभ चावल्याचं तिनं म्हटलं आहे.

रहनोला येथील एका विवाहित पत्नीचे तिच्या नवऱ्यासोबत काही दिवसांपूर्वीच मोठं भांडण झालं होतं. मात्र भांडणानंतर काही दिवसांनी या दोघांनी एकत्र राहण्यास सुरुवात केली होती. परंतु एकदा नवऱ्यासोबत चुंबन करतानाच पत्नीने त्याची जीभ इतक्या जोरात चावली की कापली गेली. या घटनेनंतर जखमी नवऱ्याला तेथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर पीडित नवऱ्यावर सफदरजंग येथे उपचार करण्यात आले आहेत. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडित नवरा बोलू शकेल की नाही याची शाश्वती दिलेली नाही.

याप्रकरणी पीडित नवऱ्याच्या वडिलांनी पोलिसांकडे आपल्या सुनेविरोधात तक्रार दाखल केली. त्या महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता, नवरा चांगला दिसत नसल्याच्या रागात तिने हे असं विचित्र कृत्य केल्याचं तिनं सांगितलं आहे. दरम्यान, या आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ही महिला ८ महिन्याची गर्भवती असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.