बाप्पासाठी रात्रीचा दिवस; स्वागताची जोरदार तयारी सुरू

सामना ऑनलाईन, मुंबई

बाप्पाचे आगमन होणार… म्हणून मुंबईकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ढोल-ताशांचा आवाज आतापासूनच घुमू लागला असून बाप्पासाठी मुंबईकर आणि गणेश मंडळे रात्रीचा दिवस करून सजावट पूर्ण करण्यासाठी वेगाने कामाला लागली आहेत. दादर, लालबागसह उपनगरांमध्ये अजूनही मखरांपासून ते लायटिंगच्या माळा तसेच सजावटीच्या इतर सामानाच्या खरेदीसाठी झुंबड कायम आहे.

रविवारी मध्यरात्रीपासूनच काही मंडळांचे गणराय तसेच मुंबईतील घरगुती गणपतींचे आगमन ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषात सुरू झाले. अनेक मुंबईकरांनी रात्री लोकलमधून गणरायांना घरी आणले. उद्या गणरायांचे आगमन होणार असल्याने आता मंडळांच्या सजावटीला आणि घरगुती गणपतींच्या सजावटीचे कामही जोरात सुरू झाले आहे.  गणेशमूर्ती कारखान्यात अजूनही बाप्पांच्या रंगरंगोटीचे काम सुरू असून  बाप्पाच्या सोंडेला हीरे जडवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी  दिवसभर आणि मध्यरात्रीही बाप्पांचे आगमन धूमधडाक्यात झाले. बाप्पांच्या आगमनाच्या उत्साहाने मुंबईतील रस्ते लखलखत्या लायटिंगच्या माळांच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्याचे चित्र आहे.

बाजारात खरेदीसाठी झुंबड कायम

बाप्पाचे आगमन १९ ऑगस्टलाच झाले. पण,उद्यापासून खऱया अर्थाने गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अगदी रहीवाशांपासून ते मंडळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि आबालवृध्दांमध्ये प्रचंड उत्साह आहे असं गं. द. आंबेकर काळेवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ,परळचे अध्यक्ष रमेश काळे यांनी म्हटलं आहे.

सकाळी वाद्यांच्या गजरात आरती घेऊन आम्ही बाप्पांचे जल्लोषात स्वागत करणार आहोत. बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना ज्या दिवशी होईल त्या दिवसाची वाट आम्ही सर्वच कार्यकर्ते अगदी आतुरतेने पहात आहोत.असं बाळगोपाळ मित्र मंडळ, विलेपार्लेचे अध्यक्ष विजय नाईकोडे यांनी म्हटलं आहे.