राष्ट्रपतींच्या सूनबाईंची भाजपविरोधात बंडखोरी

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशातील कानपूर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सूनबाई दीपा कोविंद यांनी भाजपविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रपतींच्या सूनबाईंच्या या बंडामुळे शिस्तबद्ध पक्ष असा टेंभा मिरवणाऱया भाजपला चांगलाच दणका बसला आहे.

दीपा कोविंद या राष्ट्रपती कोविंद यांचे पुतणे पंकज यांच्या पत्नी आहेत. कानपूर महापालिकेच्या झिझकनगर समितीच्या अध्यक्षपदासाठी त्या इच्छुक होत्या. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीही केली होती. पण भाजपने ऐन वेळी दीपा कोविंद यांच्याऐवजी सरोजिनीदेवी कोरी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संतापलेल्या दीपा कोविंद यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड केले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती कोविंद हे झिझक येथील रहिवासी असून तिथेच त्यांच्या कुटुंबातील दोन दावेदारांचे तिकीट भाजपने कापले आहे. भाजपने उमेदवारी दिलेल्या सरोजिनीदेवी कोरी यांना कोणीही ओळखत नाही. आम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतलेली आहे तरी आम्हाला डावलण्यात आले आहे. पक्षाचा हा निर्णय आम्हाला पटलेला नाही. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन दीपा कोविंद यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंकज कोविंद यांनी सांगितले.