जम्मू-कश्मीरमधील राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांनी वाढवली

28

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

जम्मू–कश्मीरमधील राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच तीन तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जाकडेकर यांनी दिली. पंतप्रधान  मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या सरकारची मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर पहिलीच कॅबिनेट बैठक बुधवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीत जम्मू-कश्मीरमधील कायदा व सुव्यवस्थेचा आढवा घेतल्यानंतर 3 जुलै 2019 रोजी संपत असलेला राष्ट्रपती राजवटीचा कालावधी आणखी सहा महिन्यांनी वाढविण्यास मंजुरी दिली.

तीन तलाक विधेयक पुन्हा मांडणार

अनेक मुस्लिम देशांमध्ये तिहेरी तलाकची पद्धत रद्द करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात यासंदर्भातील कायद्यात बदल करणारे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले होते, मात्र राज्यसभेत बहुमताअभावी ते मंजूर झाले नाही. लोकसभेची मुदत संपल्याने हे विधेयक बाद झाले होते. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात तीन तलाकसंदर्भातील किधेयक नव्याने सादर करण्याचा निर्णय घेतल्याचे जावडेकर म्हणाले.

आधार सक्ती नाही

केंद्र सरकारने आधार आणि अन्य कायदे (संशोधन) विधेयकाला ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांक देण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. जम्मू-कश्मीर आरक्षण विधेयक 2019 ला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे जम्मू-कश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना मदत होईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या