हिरव्या चाऱयाचे भाव गगनाला भिडले

2

सामना ऑनलाईन ,सटाणा

 दि. 11 (सा. वा.) – दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर चाऱयाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच आता हिरव्या चाऱयाचे भाव गगनाला भिडल्यामुळे प्रश्न आणखीनच बिकट बनला आहे. मध्य प्रदेश गुजरात या ठिकाणांहून आणाव्या लागत असलेल्या चाऱयाच्या एका ओळीसाठी 5 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱयांपुढे जनावरांना जगवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षी परिसरात सुरुवातीला जेमतेम पावसावर रब्बी पिकांची पेरणी केली होती. नंतर पावसाने दीड महिने दांडी मारल्याने पाहिजे त्या प्रमाणात पिके आली नाही. ऐन कापणीच्या वेळेस पावसाने धुमाकूळ घातल्याने मका, बाजरीचा कडबा खराब झाला होता. त्यामुळे चाऱयाचे प्रमाण कमी झाले. शेतकऱयांकडे साधारण मे महिन्यापर्यंत जनावरांना पुरेल एवढा चारा असतो. मेच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस पडल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनंतर सर्वत्र हिरवा चारा शिवारात उपलब्ध होत असतो. परंतु चालू वर्षी अल्प पाऊस झाल्याने शेतकऱयांकडील चारा एप्रिल महिन्यात संपला आहे. त्यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच दरवर्षी परतीचा पाऊस पडत असे. त्यामुळे विहिरीचे पाणी एप्रिल महिन्यापर्यंत टिकून राहत असे. पाण्यामुळे ज्वारीचा चारा मे महिन्यापर्यंत जनावरांसाठी पुरत असे.

या पाण्यावर शेतकरी जनावरांसाठी हिरव्या चाऱयासाठी भुईमूग, ज्वारी, मका यांची पेरणी करीत असे आणि हा चारा नेमका या वेळेस जनावरांना खाण्यासाठी उपलब्ध होत असे. मात्र चालू वर्षी परतीचा पाऊस न पडल्यामुळे विहिरींना पाणी उतरले नाही. त्यामुळे काही अल्पशा शेतकऱयांनी ज्वारीच्या कडब्याची पेरणी केली. त्या हिरव्या कडब्याच्या चाऱयाचे भाव गगनाला भिडले आहे.

वीस गुंठे तुकडय़ात पाच ओळी

साधारण एका ओळीचा भाव चार-पाच हजार रुपये झाला आहे. या एका ओळीत एक ट्रक्टर ट्रॉलीभर चारा येतो. एका वीस गुंठे तुकडय़ात साधारण पाच ओळी असतात आणि या एका तुकडय़ाची किंमत वीस हजार रुपयांपर्यंत आहे. काही तुरळक शेतकऱयांकडे उसाचा चारा आहे. या उसाच्या एका सरीचा भाव (याला ग्रामीण भागात बेले म्हणतात.) हजार ते पंधराशे रुपये झाला आहे. उसाच्या एका सरीत साधारण एक बैलगाडीभर चारा येतो. त्यामुळे सततच्या पडणाऱया दुष्काळामुळे शेतकऱयाला आपले महागडे पशुधन जगविणे मुश्कील झाले आहे. हिरव्या चाऱयाचा भाव गगनाला भिडला आहे.