रुबाबदार खादी…

मनीषा गुरुव, [email protected]

पोलिसांचा गणवेश मुळातच रुबाबदार… आता त्यात खादीची भर पडलीय…

सामाजिक आंदोलनास आपले नाव जोडून ठेवणाऱया खादीची स्वतःची अशी शान आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेली ही खादी आता खाकी वर्दीमध्येसुद्धा दिसणार आहे. कवी, लेखक, पत्रकार आणि राजकीय नेते यांची ओळख असलेली खादी आता फक्त त्यांचीच राहणार नसून ती आता खाकी वर्दीमध्ये म्हणजेच पोलिसांचीदेखील ओळख बनणार आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ महाराष्ट्र पोलिसांचे हे ब्रीदवाक्य आणखीन रुबाबदार होणार असल्याचे मत अनेक पोलीस अधिकाऱयांनी व्यक्त केलंय.

राज्यातील पोलिसांनी आठवडय़ातून एकदा तरी खादीचा गणवेश घालावा असा आदेश नुकताच राज्याच्या पोलीस मुख्यालयातून काढण्यात आला आहे. टेरीवूड कॉटनपासून इटालियन कापडापर्यंत खाकीच्या ५० हून अधिक रंगछटा आहेत. परंतु खादीत गडद आणि फिका अशा दोनच रंगछटा असल्यामुळे खाकी वर्दीमध्ये खादी किती रुबाबदारपणा सांभाळेल हे लवकरच समोर येणार आहे. पोलिसांच्या विरोधात घडणाऱया अनेक घटनांनी रुबाबदार खाकी बऱयाच वेळा डागाळलेली देखील आहे. यामुळेच या खाकीचा आपला रुबाबदारपणा कायम राहावा म्हणून खाकीमध्ये खादीचा समावेश केला गेला आहे असे मत बऱयाच पोलीस अधिकाऱयांचे आहे. अंगावर खाकी वर्दीचा गणवेश असेल तर मानसिक दृष्टय़ा पोलीसकर्मींमध्ये चांगला बदल घडू शकतो व पोलीस विभागातील भ्रष्टाचारासदेखील आळा बसू शकतो, असे मत काही पोलीस अधिकाऱयांशी केलेल्या चर्चेतून समोर आले.

नांदेड परिक्षेत्राताली हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक सुजाता पाटील यांनी चर्चा करताना सांगितले की, खादीपासून तयार केलेले कपडे हे फक्त आकर्षकच नाहीत तर ते रुबाबदार देखील असतात. कोणत्याही वयात खादीचा पेहराव शोभूनच दिसतो. यातूनच स्वदेशी भावनादेखील वाढीस लागते. पोलीस विभागात बरेच आयपीएस अधिकारी खाकीमध्ये खादीचा वापर करतात. मुंबईच्या कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये बीट मार्शल म्हणून कार्यरत आशा ठिकरे हिचे म्हणणे आहे की आम्हा महिला पोलिसांचा खादीचा गणवेश रुबाबदारच दिसणार आहे. परंतु खादीच्या गणवेशात असणाऱया महिला पोलीस मात्र खाकी-खादी गणवेश कसा परिधान करतील हे अजून गुलदस्त्यातच आहे. बीट मार्शल आशा सांगते की, खादी गणवेशामुळे लोकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोनदेखील सकारात्मक होऊ शकतो.

हा मिलाफ प्रतिमा उंचावेल

विशेष पोलीस महानिरीक्षक (बीआरपी सिक्युरिटी) कृष्णप्रकाश यांच्याशी चर्चा केली असता त्यांचे म्हणणे आहे की खाकी व खादी तशा पाहिल्या तर बऱयाचवेळा बदनाम झाल्या आहेत, परंतु याचा एकत्र मिलाफ नक्कीच आपला रुबाबदारपणा वाढवू शकतो. पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांचे म्हणणे आहे की, त्यांना अजून या आदेशाबाबत माहिती नाही. मात्र आठवडय़ातून एकदा खादीचा गणवेश असेल तर उत्तमच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बऱयाच आयपीएस अधिकारी तसेच पोलीस दलातील अनेक विभागांशी जोडल्या गेलेल्या विभागातील पोलीस अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार खाकीमध्ये खादीचा गणवेश आल्यामुळे समाजात पुनश्च पोलिसांची एक नवीन प्रतिमा तयार होऊ शकते.