97व्या वर्षी गाडी चालवून अपघात, प्रिन्स फिलिप यांनी लायसन्स परत केले

8

सामना ऑनलाईन । लंडन

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 97 वर्षीय पती प्रिन्स फिलिप यांनी अखेर आपले ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर केले आहे. 97 व्या वर्षात कार चालवून अपघात करून दोन महिलांना जखमी करणाऱया फिलिप यांच्या वयावर आणि त्यांच्या ड्रायव्हिंगवर गेल्या काही दिवसांपासून टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर फिलिप यांनी आपले लायसन्स परत केले आहे.

18 जानेवारी रोजी सँड्रिघम इस्टेटजवळ प्रिन्स फिलिप यांच्या लँड रोव्हर कारने अन्य एका वाहनाला धडक दिली होती. त्यावेळी प्रिन्स स्वतः ड्रायव्हिंग करीत होते. अपघातात फिलिप यांना दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या मागे असलेल्या कारमधील दोन महिला जखमी झाल्या. एकीच्या मनगटाला तर दुसरीच्या गुडघ्याला दुखापत झाली. तसेच पाठीमागच्या सीटवर असलेले बाळही जखमी झाले होते.

सध्या ब्रिटनध्ये वाहन चालविण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. मात्र वयाच्या 70 वर्षांनंतर दर तीन वर्षांनी लायसन्सचे नूतनीकरण करावे लागते.