नालासोपाऱ्यात बनावट प्रिंटिंग टोनर, कार्टेजचा दीड कोटींचा साठा जप्त

सामना प्रतिनिधी, ठाणे

नावाजलेल्या बॅण्डेड कंपनीचे बनावट प्रिंटिंग साहित्य नालासोपाऱयात बनवून बाजारात विकणाऱया टोळीचा पर्दाफाश वाळीव पोलिसांनी केला आहे. येथील एका गोडाऊनमध्ये पोलिसांनी छापा मारून तब्बल दीड कोटींचा साठा जप्त केला. शेकडो टोनर, कार्टेज, इंक बॉटेल, स्टिकरसह मशीनसाठा जप्त केला आहे.

एचपी कंपनीच्या कार्टेज, टोनर लवकर संपत असून त्याची गुणवत्ता बरोबर नसल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून वाढल्या होत्या. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली. दरम्यान नालासोपाऱयातील खान कंपाऊंडच्या 17 क्रमांकाच्या गल्लीतील एका गाळ्यामध्ये बनावट टोनर, कार्टेज बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी येथे छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात एचपी कंपनीचे प्रिंटिंग साहित्य सापडले.

हा सर्व साठा बनावट असल्याचे तपासात उघड होताच पोलिसांनी ते जप्त केले आहे. या साठ्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये असून या प्रकरणी भिमजी वाय्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर व विजय चव्हाण यांनी दिली.

summary- printing material worth rupees 1.5 crore seized in nalasopara