आर्थर रोडमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कैद्यांवर इलाज


सामना ऑनलाईन, मुंबई

अमुक दुखतंय, तमुक दुखतंय, बरे वाटत नाही अश्या तक्रारी करणाऱया कैद्यांना टेलिमेडिसिनद्वारे कारागृहातच उपचार मिळण्यास सुरुवात झाली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे जे.जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधला जात असून ते डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे कारागृहातील डॉक्टर कैद्यांवर उपचार करीत आहेत. टेलिमेडिसिन सेवेमुळे बऱ्याच गैरकारभारांना आळा बसणार असून पोलीस व तुरुंग प्रशासनाला यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.

कैद्यांना उपचारासाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना मोठ्या प्रमाणात पोलीस गार्डची आवश्यकता भासते. हॉस्पिटलमध्ये कैदी नातेवाईकांना भेटतात. या सर्वांना आळा घालण्यासाठी अपर पोलीस महासंचालक बी. के. उपाध्याय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक राजवर्धन यांच्या मार्गदर्शनानुसार टेलिमेडिसिन सेवा सुरू करण्यात आली आहे.

कैदी आपली समस्या डॉक्टरांना सांगतो. त्यानुसार त्या कैद्याला काय औषधोपचार करायचा ते डॉक्टर सांगतात. त्यानंतर कारागृहातील एमबीबीएस डॉक्टर उपचार करतात. परंतु सोनोग्राफी, एक्सरे आदी मोठय़ा उपचाराची गरज असल्यास कैद्यांना हॉस्पिटलला नेण्यात येत असं तुरूंगाधिकारी हर्षद अहिरराव यांनी सांगितलं.