इन्स्टाग्रामची राणी ब्रॅण्डस्च्या प्रमोशनासाठी घेते आठ लाख रुपये

सामना ऑनलाईन, चेन्नई

आपल्या डोळय़ांच्या अदांनी सोशल मीडियावर अनेकांना घायाळ करणाऱया दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वारियरचे अल्पावधीतच इन्स्टाग्रामवर ५० लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. ही अभिनेत्री आता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लाखो रुपयांची कमाई करीत आहे. प्रिया तिच्या अकाऊंटवरून मोठमोठय़ा ब्रॅण्डस्चे प्रमोशन करीत असून एका ब्रॅण्डच्या जाहिरातीच्या मोबदल्यात ती तब्बल आठ लाख रुपये कमवित आहे. डोळय़ांच्या आतिषबाजीतून तरुणांना वेड लावणाऱया प्रियाचा व्हिडीओ ‘ओरू अडार लक’ या मल्याळी चित्रपटातील आहे. हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून येत्या जून महिन्यात तो प्रदर्शित होणार आहे. इन्स्टाग्रामवर प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या लाखांहून अधिक आहे. प्रिया एखाद्या मोठय़ा ब्रॅण्डचे प्रमोशन करण्याकरिता ८ लाख रुपये घेत असून जगातील मोठय़ा स्टार्समध्ये प्रिया वारियर हिचा समावेश झाला आहे.