मला आवडलेलं मगरीचं सूप

अभिनेता प्रियदर्शन जाधव मनापासून मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेतो. अगदी मगरीचं सूपसुद्धा…

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय?
– ‘खाणं’ आणि ‘नाणं’ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत माझ्या दृष्टीने.

खायला काय आवडतं?
– कुठलाही मांसाहारी पदार्थ खायला आवडतो. तसेच शाकाहारी पदार्थांमध्ये गोड पदार्थ आणि वांग्याचं भरीत, वरण-भात खूप आवडतं.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?
– माझी शरीरयष्टी मुळातच बारीक असल्यामुळे तशी वेगळी काळजी घेण्याची वेळ आली नाही. तरीही खाण्याच्या वेळा पाळतो आणि कितीही आवडलं तरी आवश्यक तेवढंच खातो. हीच माझी फिटनेसची काळजी.

डाएट करता का?
– हो, भात शक्यतो टाळतो. बिर्याणीसारखा जड आहार दुपारी घेतो. रात्रीच्या जेवणात हलका आहार असतो.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता?
– चार वेळा तरी होतं.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता?
– ठाण्यातलं सत्कार, पुण्यातलं फिश-करी राइस, शिवाजी पार्कातलं वेंगुर्लेकर इथे जायला आवडतं.

प्रयोगानिमित्त दौऱयावर असताना आवडलेला पदार्थ?
– एका कार्यक्रमानिमित्त परदेशात गेलो होतो. तिथे क्रोकोडाईल (मगरीचं) सूप प्यायलो. फ्लॅम चावडर हाही नवा पदार्थ खाल्ला.

स्ट्रीट फूड आवडतं का?
– हो, मिसळ, भेळ, पाणीपुरी.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?
– मला घरी केलेले चिकन, मटण, कोळंबी आणि मासे आवडतात.

पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा काय खायला घालता?
– आवर्जून मासे खाऊ घालतो.

फ्रेंच टोस्ट
ब्रेड घ्यायचा. ब्राऊन ब्रेड असेल तर उत्तम. त्यानंतर २ चमचे दुधात २ अंडी फेटायची. त्यात चवीनुसार मीठ घालायचं. या फेटलेल्या मिश्रणात ब्रेड संपूर्ण बुडवून घ्यायचा. फ्राय पॅनवर तेल किंवा तूप घालून ते गरम झाल्यावर हे ब्रेड व्यवस्थित तळून घ्यायचे. या तळलेल्या ब्रेडमध्ये चिकन किंवा मटण घालून सँडविचप्रमाणे सर्व्ह करू शकता.