समुद्रवीर ‘कुंजाली’वर चित्रपट; ‘हे’ तगडे कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार

सामना ऑनलाईन, मुंबई

कालिकतचा राजा झामोरीन याच्यासाठी पोर्तुगीजांविरूद्ध समुद्रात आरमार उभे करून कडवी झुंज देणाऱ्या मोहम्मद अली उर्फ कुंजाली यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाच्या निर्मितीचा प्रख्यात दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी संकल्प सोडला आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात दक्षिणेकडील अभिनेते मोहनलाल, नागार्जुन याशिवाय बॉलीवड अभिनेते परेश रावल, सुनील शेट्टी महत्वाच्या भुमिकांमध्ये दिसणार आहे.

मराक्कर लायन ऑफ दे अरेबियन सी असं या चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं असून मोहनलाल हे या चित्रपटाचा सहनिर्माते असणार आहे. १६ व्या शतकात घडलेल्या घटना देशातील नागरिकांसमोर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचं प्रियदर्शन यांनी सांगितले आहे. हा चित्रपट नौदलाला समर्पित करणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे. इसवी सन १५०२ ते १६००  या कालखंडामध्ये झामोरीन राजाने पोर्तुगीजांशी लढा दिला होता. समुद्रामार्गे आक्रमण करण्यात पटाईत असलेल्या या वसाहतखोर पोर्तुगीजांना रोखून त्यांच्या तोंडाला फेस आणणारा वीर म्हणून कुंजाली यांचे नाव घेतले जाते. कुंजाली यांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे समुद्र मार्गाने व्यापार करणारा एक सामान्य व्यापारी झामोरीन राजाच्या नौदलाचा प्रमुख कसा बनला आणि कट कारस्थानांमुळे त्याचा जीव कसा गेला हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

पोर्तुगीजांनी झामोरीन राजाला फितवलं आणि कुंजाली हा त्याचे साम्राज्य बळकावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगत कान भरले. यामुळे कालिकत राज्यात दुही माजली आणि कुंजालीच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांनी त्यावर सहज ताबा मिळवला. असं सांगितलं जातं की कुंजालीला अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आले, त्याचे शरीर फाडण्यात आले आणि त्याचे शिर गोव्यामध्ये नेऊन फेकून देण्यात आले. अनेकांना कुंजाली यांच्याबद्दल माहिती नसल्याने चित्रपटाद्वारे या समुद्रीयोद्धाला आदरांजली वाहण्याचा प्रयत्न करणार असल्याचं प्रियदर्शन यांनी सांगितलं आहे.