शिवसैनिकांना बहीण मिळाली; प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवबंधन बांधले!

145

सामना ऑनलाईन । मुंबई

काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बांधून प्रियंका चतुर्वेदी यांचे शिवसेनेत स्वागत केले. प्रियंकाच्या रूपाने शिवसैनिकांना लढवय्यी बहीण मिळाली, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

प्रियंका चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रियंका यांचे कर्तृत्व, बुद्धिमत्तेचा महाराष्ट्राला आणि देशाला उपयोग होईल अशी जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाईल. त्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरात शिवसेनेचे काम करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

यावेळी प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, काँग्रेसमध्ये आपण दहा वर्षे प्रभावीपणे काम केलं, पण आपल्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारं कृत्य झाल्याने पक्ष सोडला. मुंबई ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. दिल्लीत गेल्याने मुंबईकरांसाठी, महिलांसाठी जे काही करायचं होतं त्यापासून दूर गेले. काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, मात्र त्यामुळे पक्ष सोडला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लहानपणापासून शिवसेना हाच जवळचा पक्ष

मी मुळची मुंबईकर आहे. लहानपणापासूनच शिवसेना हा माझ्यासाठी जवळचा पक्ष आहे. महाराष्ट्रीय मग तो महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असला तरीही त्याच्या मनात शिवसेनेविषयी कायमच आत्मियता असते. तशी ती माझ्याही मनात आहे. मुंबईकरांना, महाराष्ट्राला अत्यंत जवळचा वाटणारा आणि युवकांसाठी, महिला सुरक्षा, महिला सक्षमीकरणासाठी काम करणारा पक्ष असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या