मरीन लाइन्स म्हणजे गैरसोयींचा ‘पूल’,  मेट्रोच्या दिशेचा पूल बंद केल्याने त्रासात भर

सामना प्रतिनिधी । मुंबई

पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाच्या अशा मरीन लाइन्स स्थानकाची सध्या प्रवाशांच्या गैरसोयींचा ‘पूल’ साधणारे स्थानक अशीच ओळख बनली आहे. मरीन लाइन्स स्थानकाला जोडणारे पादचारी पूल तोडण्यात आले आहेत, तर मेट्रोकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्ता ओलांडताना विद्यार्थी आणि ज्येष्ठांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

महापालिकेने पुलांच्या केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये मरीन लाइन्स स्थानकातील चंदनवाडी स्मशानभूमीच्या दिशेने बाहेर पडणार्‍या पादचारी पुलाचा समावेश होता. 2008 साली हा पादचारी पूल धोकादायक म्हणून घोषित करून पाडण्यात आला. पुलावरून एकाच वेळी 30 ते 35 माणसे चालायला लागली की पूल हलायचा अशी तक्रार होती.

दुसर्‍या पादचारी पुलाची अवस्था काही वेगळी नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मरीन लाइन्सजवळील वानखेडे स्टेडियम गेट क्रमांक 4 कडे जाणारा पादचारी पूल धोकादायक ठरवून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यातच भर म्हणजे मरीन लाइन्स स्थानकात सर्व प्लॅटफॉर्म जोडणारा चर्नी रोडच्या दिशेच्या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्याची डागडुजी कधी पूर्ण होणार याच्या प्रतीक्षेत प्रवासी आहेत.

मरीन लाइन्सजवळील वानखेडे स्टेडियम गेट क्रमांक 4 कडे जाणारा पादचारी पूल महर्षी कर्वे रोड आणि आनंदीलाल पोतदार मार्ग यांना जोडतो. हा पूल शकुंतला कांतीलाल ईश्वरलाल जैन या शाळेजवळ आहे. हा पूल बंद झाल्याने विद्यार्थी आणि पालकांची मोठी गैरसोय होत आहे.

नरीमन पॉइंट, कुलाबा, चर्चगेट परिसरात कामानिमित्त वाहनाने जाणारे अनेक नागरिक महर्षी कर्वे मार्गाचा वापर करतात. तसेच या मार्गावर चर्चगेट, मरीन लाइन्स, चर्नी रोड स्थानके असून रेल्वे स्थानकांमध्ये महर्षी कर्वे मार्गावरून मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा सुरू असते. ‘पिक अवर’ला मरीन लाइन्स स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील एक्झिट पॉइंटवरून प्रवाशांचे जथेच्या जथे बाहेर पडतात. पादचारी पूल नसल्याने वाहने सुरू असतानाच रस्ता ओलांडण्याची जीवघेणी धडपड केली जाते, अशी प्रतिक्रिया प्रवासी जयश्री गायकवाड यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या