प्रा. अविनाश बिनीवाले

>> प्रवीण कारखानीस

यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाने ज्या व्यासंगी आणि तपस्वी व्यक्तीला डॉ. अशोक केळकर यांच्या नावे असलेला अत्यंत सन्मानाचा असा ‘भाषा अभ्यासक पुरस्कार’ हा एक लाखाचा पुरस्कार प्रदान केला त्या व्यक्तीचे नाव आहे अविनाश बिनीवाले! पुण्याच्या नूतन मराठी शाळेचे आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी. संस्कृत आणि जर्मन या दोन्ही भाषा आत्मसात करून पुढे त्यांनी जर्मन भाषेत मुंबई विद्यापीठाची ‘एम.ए.’ ही स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली. सुरुवातीस कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये आणि त्यानंतर अनेक वर्षे मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये जर्मन भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केले. विख्यात उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांच्या आस्थापनातही त्यांनी जर्मन – इंग्रजी भाषांतराच्या कामात मोलाचे योगदान दिले.

बिनीवाले यांनी जर्मन भाषेची ओळख करून देणारी आणि जर्मनीला जाणाऱ्या व्यक्तीला व्यवहारात अतिशय उपयुक्त ठरणारी डझनावारी पुस्तके लिहिली. शब्दकोश प्रकाशित केले. फ्रेंच भाषेवर प्रभुत्व मिळवून त्याही भाषेचा ओनामा जाणून घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके लिहिली. विशेष म्हणजे अविनाश बिनीवाले यांनी दर्जेदार हिंदी भाषेतही प्रचंड लेखन केले आहे. भाषांविषयी अशी असीम आस्था आणि त्या भाषा आत्मसात करण्यासाठी आवश्यक असलेली व्यासंगी वृत्ती ज्यांच्या रोमारोमात भिनलेली आढळते अशी माणसे आज क्वचितच कुठे आढळत असतील. अशा विद्वज्जनांमध्ये बिनीवाले हे बिनीचे सरदार आहेत यात शंकाच नाही. विशेष म्हणजे बिनीवाले यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ हा हिमालयाच्या परिसरात डोळसपणे भटकंती आणि वास्तव्य करून सार्थकी लावला आहे. त्यामुळेच त्यांची स्वानुभवावर आधारित पुस्तके ‘आजचा अरुणाचल प्रदेश’, ‘पूर्वांचल- आव्हान तथा आवाहन’, ‘आतंकवाद में झुलसता पूर्वांचल’, ‘कैलाश- मानस’ लक्षवेधी ठरली आहेत.

‘जय कैलाश’ या त्यांच्या मूळ हिंदीत लिहिलेल्या पुस्तकाला हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ‘नर्मदे हर’ हे त्यांचे नर्मदा परिक्रमावर आधारित प्रवासवर्णनदेखील प्रत्ययकारी ठरले. १९६२ साली चीनने केलेल्या सैनिकी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हिंदी-मराठी भाषेत लिहिलेली, ‘बोमदिला’ ही कादंबरी अनेक अर्थाने नावीन्यपूर्ण ठरली. अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये ती अनुवादित झाली. आसामी भाषेत अनुवादित झालेल्या या त्यांच्या कादंबरीचे प्रकाशन ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांच्या हस्ते झाले. अविनाश बिनीवाले यांचे जर्मनीतले प्रवासानुभव ‘गरुडांच्या देशात’ या त्यांच्या पुस्तकात आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या सत्तरच्या घरात जाते. इतके विपुल आणि कसदार लेखन करणाऱ्या अविनाश बिनीवाले या व्यासंगी भाषा अभ्यासकांचा आणि विशेषकरून आयुष्यभर डोळसपणे भ्रमंती करणाऱ्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला याचा खूप खूप आनंद वाटतो.