प्रा. मु. ब. शहा

अध्यापन, साहित्य, लेखन, विद्यार्थी संघटक, हिंदी भाषा आणि गांधीवादी विचारांचा प्रसार अशा अनेक विश्व कार्यात आयुष्य वाहून घेणारे प्रा. डॉ. मु. ब. शहा यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा एक खंदा पुरस्कर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.  असंख्य आघाडय़ांवर काम करताना जे गुण लागतात, जी ऊर्जा, मेहनत, चिकाटी लागते, जो शांत व संयम स्वभाव लागतो ही सर्व वैशिष्टय़े डॉ. मु. ब. शहा यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. शैक्षणिक, सामाजिक, अध्यापन, पत्रकारिता, लेखन, हिंदी भाषा आणि साहित्याचा प्रसार या बरोबरच मु. ब. शहा यांनी भारतरत्न बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ आंदोलन, राष्ट्र सेवा दल आणि छात्र भारती यासह अन्य समाजवादी परिवारातील संघटनांचे काम अशा विविध जबाबदाऱया सांभाळल्या. धुळे शहरातील एस. एस. व्ही. पी. एस. कला महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक असलेल्या शहा यांनी अध्यापन करताना आणि निवृत्तीनंतर हिंदीच्या प्रसारासाठी वाहून घेतले होते. आयुष्यातील सुमारे ४५ वर्षे त्यांनी हिंदीचे प्रचारक म्हणूनच काम केले. त्यावरून हिंदी भाषा आणि साहित्य याप्रती त्यांची असलेली निष्ठा आणि प्रेम दिसून येते. पुण्यातील महाराष्ट्र हिंदी राष्ट्रभाषा सभेचे उपाध्यक्ष, नाशिक विभागाचे अध्यक्ष तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हिंदी विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राष्ट्रभाषा भवनाशी त्यांची नाळ कायमची जोडलेली राहिली. राष्ट्रभाषा भवनातील कार्यक्रमास शहा आवर्जून उपस्थित राहत असत. संशोधनाचीदेखील त्यांना प्रचंड आवड होती. त्यातूनच धुळे शहरातील का. स. वाणी प्रगत मराठी अध्ययन संस्थेत त्यांनी काम केले. तेथील अनेक ग्रंथांचे संपादन केले. खान्देशच्या सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करताना त्याच्या वेगवेगळय़ा पैलूंवर प्रकाशझोत टाकला. शहरातील समर्थ वाग्देवता मंदिर आणि इतिहासाचार्य वि. का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळातही त्यांनी काम पाहिले. राजवाडे इतिहास संशोधन मंडळाच्या विश्वस्तपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळले. मंडळाच्या १३ खंडांचे तसेच खान्देशच्या सांस्कृतिक इतिहासाच्या सहा खंडांचे संपादन शहा यांनी केले. मराठी आणि हिंदी साहित्य तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातही शहा यांचा संचार होता. अनेक मराठी-हिंदी नियतकालिकांमध्ये त्यांनी लेखन केले. महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीचे ते सदस्य होते. ज्येष्ठ समाजवादी नेते यदुनाथ थत्ते यांच्याबरोबरीने शहा यांनी काम केले. मराठी आणि हिंदी साहित्य क्षेत्रांत वावर असल्याने त्याचा लाभ दोन्ही साहित्य प्रकारांना झाला. शहा यांनी मराठीतील अनेक पुस्तकांचे हिंदीत तर हिंदीतील साहित्याचे मराठीत अनुवाद केले. विशेषतः प्रख्यात लेखिका अमृता प्रीतम यांच्या ‘रसीदी टिकट’चा त्यांनी मराठीत केलेला अनुवाद खूप गाजला. याशिवाय ‘खान्देशचे गांधी-बाळूभाई मेहता’, सत्यशोधक कुंभार गुरुजी, श्यामची आई (नाटय़ रूपांतर), यदुनाथ थत्ते यांचे चरित्र, अक्षरयात्रा, नवजागरण और हिंदी साहित्य, निबंध कौमुदी, हिंदू समाज संघटन और विघटन या डॉ. पु. ग. सहस्त्र्ाबुद्धे यांच्या पुस्तकाचा अनुवाद, मी आणि बालकवी आदी अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. शिवाय पु. ल. देशपांडे यांचे ‘मातृधर्मी सानेगुरुजी’, रजिया पटेल यांचे चाहूल, नरहर कुरुंदकर यांचे विचार तीर्थ, साधनाताई आमटे यांचे समीधा आदी पुस्तकांचा हिंदीत शहा यांनी केलेला अनुवादही वाचकमान्य झाला. राष्ट्रभाषा सभा, राष्ट्र सेवा दल आणि आंतरभारती या संस्थांमध्येही त्यांनी काम केले. देशातील वेगवेगळय़ा १४ भाषांमध्ये राष्ट्रीय गीत गायन करणाऱया २२ गायकांना सोबत घेऊन त्यांनी ‘हम हिंदुस्थानी’ या गटाची स्थापना केली होती. या गीताद्वारे अनेक शहरांमध्ये त्यांनी हिंदुस्थानी स्वातंत्र्य संग्रामाची कहाणी जनतेसमोर सादर केली. स्काऊट गाइड चळवळीतही त्यांचा मोठा सहभाग होता. प्राध्यापक असताना आणि नंतरही विद्यार्थीवर्ग गांधी विचारधारा आणि सामाजिक बांधिलकीशी जोडला जावा यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. छात्र भारतीसारखी संघटना ही मु. ब. शहा यांचीच देणगी. विविध क्षेत्रांत सलग पाच-साडेपाच दशके अव्याहत कार्यरत राहणारा,  एक कटिबद्ध आयुष्य जगणारा हिंदी भाषेचा आणि समाजवादी विचारांचा एक खरा आणि खंदा शिलेदार मु. ब. शहा यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. समाजवादी चळवळीबरोबरच शैक्षणिक, साहित्य, हिंदी भाषा आणि विद्यार्थी चळवळ आदी क्षेत्रांचीही त्यांच्या निधनाने हानी झाली आहे.