प्राध्यापक तेलतुंबडे यांच्या याचिकेवर 22 फेब्रुवारी रोजी सुनावणी

52

सामना प्रतिनिधी । मुंबई

भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच शहरी नक्षलवादप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी आपल्यावरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी हायकोर्टात केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर 22 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. तसेच न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी तेलतुंबडे यांना 14 आणि 18 फेब्रुवारी रोजी पुणे पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत तेलतुंबडे यांना अटक होणार नसल्याने दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना 11 फेब्रुवारीपर्यंत अटक करू नये असे आदेश दिले होते. पुणे पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत आज मिळाल्याने दोन दिवसांची मुदत देण्यात यावी अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. मिहीर देसाई यांनी केली परंतु त्याला सरकारी वकील अरुणा पै यांनी आक्षेप घेतला व मुदतवाढ देऊ नये अशी न्यायालयाकडे विनंती केली. हायकोर्टाने याची दखल घेऊन पुणे पोलीस ठाण्यात 14 आणि 18 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच तेलतुंबडे यांना अटक करण्याची गरज भासली तर एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तेलतुंबडे यांची सुटका करावी अशा सूचनाही पोलिसांना केल्या व 22 फेब्रुवारीपर्यंत याबाबतची सुनावणी तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या